स्थानिक पातळीवरील रस्ते, गटार, वीज, पिण्याचे पाणी, आरोग्य या मूलभूत समस्या तातडीने सोडवणे हा तालुकास्तरीय ‘जनता दर्शन’ कार्यक्रमाचा उद्देश आहे असे खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी सांगितले.


खानापूर तालुक्यातील नंदगड येथील तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कल्याणमंडपात बुधवारी आयोजित “जनता दर्शन” कार्यक्रमाचे उदघाटन आ. विठ्ठल हलगेकर यांच्याहस्ते झाले. त्यानंतर बोलताना ते म्हणाले की, लोकांच्या समस्या स्थानिक पातळीवरच सोडवणे हा जनता दर्शनचा उद्देश आहे.

लोक त्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी जिल्हा मुख्यालयात फिरणे टाळू शकतात. तालुकास्तरावरच रस्ते, गटार, वीज, पिण्याचे पाणी, आरोग्य आदी समस्या सोडवणे शक्य होणार आहे असे ते म्हणाले.
खानापूर तालुक्यात तब्बल दहा वर्षांनंतर जनता दर्शनचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यात महिन्यातून वा पंधरवड्यातून एकदा जिल्हा पालक मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जनता दर्शन कार्यक्रम घेण्यात येत आहे. तालुका स्तरावरील पहिल्या कार्यक्रमासाठी खानापूरची निवड केल्याबद्दल आमदार विठ्ठल हलगेकर यांनी आभार व्यक्त केले.

जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, लोकांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी विभागनिहाय दहा काउंटर उभारण्यात आले आहेत. तक्रार निवारणासाठी काय पावले उचलावीत, याची माहिती अर्जदाराला दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक अर्जाचा सकारात्मक विचार करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून योग्य ती कार्यवाही केली जाईल. जनतेच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जनतादर्शनमध्ये जागीच कार्यवाही केली जाईल.
तालुका/जिल्हा आणि राज्यस्तरावर सोडवता येणा-या समस्यांचे निराकरण केले जाईल आणि ठराविक कालावधीत त्या सोडवण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.
यावेळी पंचायत अध्यक्ष यल्लाप्पा गुरव, उपाध्यक्षा संगीता मड्डीमनी, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, अपर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, अपर पोलीस अधीक्षक वेणुगोपाल, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी शुभम शुक्ला, प्रांताधिकारी श्रावण नायक, माजी आमदार अरविंद पाटील, पशुसंवर्धन विभागाचे उपसंचालक डॉ. राजीव कुलेर आदी उपस्थित होते.


Recent Comments