Belagavi

पिरनवाडी परिसरातील रहिवाशांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

Share

बेळगाव महानगर पालिका हद्दीत समाविष्ट केलेल्या पिरनवाडी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना महानगरपालिकेने मालमत्ता उतारे देण्याची मागणी रहिवाशांनी बेळगाव जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

माजी महापौर व सामाजिक कार्यकर्ते ऍड. नागेश सातेरी यांच्या नेतृत्वाखालील रहिवाशांच्या शिष्टमंडळाने आज जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले.

यासंदर्भात इन न्यूजला माहिती देताना माजी महापौर ऍड. नागेश सातेरी यांनी सांगितले की, 2013 मध्ये पिरनवाडी ग्रामपंचायत हद्दीतील काही भाग बेळगाव महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आला आहे. त्याआधीच सुमारे 190 कुटुंबे येथे घरे बांधून रहात आहेत. बेळगाव महानगर पालिका त्यांच्याकडून मालमत्ता कर, पाणीपट्टी आकारते. मात्र या रहिवाशांना मनपाकडून मालमत्तेचे उतारे दिले जात नाहीत. पिरनवाडी ग्रामपंचायतीकडून जागेची कागदपत्रे आलेली नसल्याने उतारे देता येत नसल्याचे मनपाकडून सांगितले जाते.

त्यामुळे आम्ही माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवली असता, 2013 मध्येच ग्रापं हद्दीचा मनपा हद्दीत समावेश केला त्यावेळीच कागदपत्रे मनपाला वर्ग केल्याची माहिती मिळाली आहे. तरीही कागदपत्रे आली नसल्याची खोटी सबब सांगून उतारे नाकारले जात आहेत. हद्दीच्या समावेशापूर्वी रहिवाशांनी मूळ मालक बजरंग पाटील आणि करिअप्पा पुजारी यांच्याकडून जागा विकत घेऊन नागरिकांनी येथे घरे बांधलेली आहेत. त्यावेळचा सातबारा मूळ मालकांच्याच नावे असल्याने अजूनही त्यांच्या नावे उताऱ्यावर आहेत. मनपा आणि पिरनवाडी ग्रामपंचायतीमध्ये काय बिनसले आहे हे आम्हाला माहित नाही. खुल्या जागांच्या करासाठीच्या नोटिसा मूळ मालकांना जात आहेत. मनपाच्या मालमत्ता उतारे मिळत नसल्याने रहिवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मनपाकडून उतारे दिले जावेत या मागणीसाठी आम्ही निवेदन दिले आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी पिरनवाडी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Tags: