नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी आज बेळगावातील शिवाजीनगर, गांधीनगर परिसरात सळसळत्या उत्साहात दुर्गामाता दौड काढण्यात आली.
श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आज सोमवारी शेकडो आबालवृद्धांच्या सहभागाने सळसळत्या उत्साहात आणि चैतन्यपूर्ण वातावरणात दुर्गामाता दौड काढण्यात आली. पांढरे शुभ्र कपडे, टोप्या घालून हातात भगवे झेंडे घेऊन असंख्य धारकरी या दौडीमध्ये सहभागी झाले होते. बेळगावातील एक प्रमुख चौक असलेल्या राणी चन्नम्मा चौकातून सोमवारच्या दौडला प्रारंभ झाला. त्यानंतर काकतीवेस रोड, खडक गल्ली, कोर्ट परिसर, चव्हाट गल्ली, पीबी रोड, आरटीओ सर्कल, शिवाजीनगर, फोर्ट रोड, गांधीनगर, भागात फिरून किल्ला परिसरातील श्री दुर्गामाता मंदिरात दौडची सांगता झाली.
दौड ज्या-ज्या परिसरात गेली तेथे नागरिकांनी विशेषतः सुवासिनींनी धारकऱ्यांचे औक्षण करून उत्साहात स्वागत केले. अनेक ठिकाणी दौडमधील धारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. जय भवानी-जय शिवाजी या घोषणांनी परिसर दुंमदूमून गेला होता. अनेक ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या जीवनातील प्रसंग साकारणारे सजीव देखावे सादर करण्यात आले. तर अनेक ठिकाणी शिवराय आणि अन्य देवदेवतांच्या मूर्तींचे पूजन करण्यात आले होते. दौडच्या मार्गावर सुबक रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या. त्यामुळे वातावरण प्रसन्न झाले होते.
दौडबद्दल प्रतिक्रिया देताना शिवाजीनगर येथील शिवानी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, मी लहानपणापासून दौडमध्ये सहभागी होत आहे. आज शिवाजीनगर तिसरी गल्ली येथे आम्ही दौडचे उत्साहात स्वागत केले. येथे पारंपरिक देखावे साकारण्यात आले आहेत. हिंदू धर्म टिकाव यासाठी अशा उपक्रमांची खूप गरज आहे.

शमिका विनायक कामूचे आणि प्रभावती प्रल्हाद पाटील या महिलांनी इन न्यूजशी बोलताना हिंदू धर्माच्या रक्षणासाठी अशा उपक्रमांची आज गरज असल्याचे सांगितले. आजकालची मुले आधुनिकतेच्या नावाखाली चुकीच्या गोष्टी करत आहेत. त्यांच्यावर धार्मिक संस्कार करण्यासाठी आणि त्यांना धर्माकडे वळवण्यासाठी दुर्गामाता दौडसारखे उपक्रम आवश्यक आहेत. आम्ही कालपासूनच दौडचे स्वागत करण्यासाठी तयारी केली. रांगोळ्या घालून परिसर सुशोभित केला आहे. आरती करून दौडचे स्वागत केले. आम्ही शिवाजीनगर तिसरी गल्ली येथे दुर्गामातेची प्रतिष्ठापना करून नवरात्रौत्सव साजरा करतो. रोज सायंकाळी सात वाजता आरती व तीर्थप्रसादाचे वाटप केले जाते.
बेळगाव शहर परिसरातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आजच्या दौडमध्ये सहभाग घेतला. दौडसोबत कडेकोट पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.


Recent Comments