वाघांची शिकार करण्यासाठी कुख्यात असलेला शिकारी चिका उर्फ कृष्णा पट्टीपवार याला एका मोठ्या कारवाईत बेळगाव वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जेरबंद केले आहे. महाराष्ट्रातील मेळघाट जंगलात वाघाची शिकार केल्याची खळबळजनक कबुली त्याने दिली आहे.
होय, यावर्षी जुलै महिन्यात बेळगाव वन विभागातील खानापूर प्रादेशिक वनक्षेत्रातील जळगा येथे चंदनाच्या झाडांची चोरी झाली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत खानापूर उप वनविभागाच्या वनाधिकाऱ्यांनी आरोपींना शोधण्यासाठी सापळा रचला होता. काही दिवसांपूर्वी बेळगाव शहरातील कणबर्गी जवळील कलखांब येथे आरोपी लपून बसल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्याच्या आधारे वनाधिकारी अधिकारी
व कर्मचाऱ्यांच्या पथकाने एका झोपडीवर छापा टाकला. झोपडीतून चंदनाचे तुकडे व धारदार शस्त्रे जप्त करून चिका उर्फ कृष्णा पट्टीपवार याला अटक केली. खानापूर उपविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक डॉ. संतोष चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ताब्यात घेतलेला हा आरोपी मूळचा मध्यप्रदेशचा आहे. त्याची कसून चौकशी केली असता, आरोपीने याआधी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील मेळघाट जंगलात वाघ आणि अस्वलांची शिकार केल्याची कबुली दिली. काही वर्षांपूर्वी मृत्यू झालेला कुख्यात वाघ शिकारी सांसाचंद याच्या टोळीचा हा सदस्य असल्याची माहिती मिळाली आहे.
ही कारवाई बेळगाव परिमंडळाचे मुख्य वनसंरक्षक मंजुनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव विभागाचे उप वनसंरक्षक शंकर कल्लोळीकर, खानापूर उपविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक संतोष चव्हाण, खानापूर प्रादेशिक वनपरिक्षेत्राचे मुख्य वनसंरक्षक नागराज बाळेहोसूर यांनी केली. त्याबद्दल वनखात्याच्या वरिष्ठाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान, उप परिक्षेत्र, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे महानिरीक्षक राजेंद्र गरवाडा यांनी मुख्य वन्यजीव वॉर्डन यांना महाराष्ट्र राज्य वन विभाग आणि वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो यांच्याशी संवाद साधून सविस्तर तपास करून लवकरच अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार तपास सुरु असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.
Recent Comments