रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणने मुलांचे मानसिक बळ वाढवण्यासाठी होप अँड हीलिंग युनिटची स्थापना केली, हे विधायक कृत्य आहे. अशा उपक्रमांचा लाभ घेऊन पालकांनी मुलांना मानसिकदृष्ट्या कणखर बनवण्यासाठी परिश्रम घ्यावेत असे आवाहन रोटरीचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर नासीर बोरसादवाला यांनी काढले.
रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या वतीने विद्यार्थ्यांमधील मानसिक बळ वाढवण्यासाठी होप अँड हीलिंग युनिटची स्थापना केली आहे. बेळगावातील सेंट जर्मन इंडियन हायस्कूलमध्ये आज, शनिवारी त्याचे उदघाटन रोटरीचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर नासीर बोरसादवाला यांनी केले.
यावेळी बोलताना रोटरी गव्हर्नर नासीर बोरसादवाला पुढे म्हणाले की, रोटरी क्लब बेळगावात असे अनेक विधायक व समाजाभिमुख कार्य करत आहे याचा आनंद आहे. सर्व मुलांना आधी वाचनाची क्षमता असली पाहिजे. अलीकडे मुले मोबाईल फोनकडे वळत आहेत आणि वाचनाची सवय हरवत चालली आहे. आजच्या मुलांनी व तरुणांनी मोबाईल गेमचा नाद सोडून या वयात मानसिक व शारीरिकदृष्ट्या खंबीर होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
इव्हेन्ट चेअरपर्सन डॉ. स्फूर्ती मास्तीहोळी यांनी यावेळी बोलताना पालक व शिक्षकांनी मुलांच्या मानसिक स्थितीबाबत जागृती करावी. आजच्या मुलांना मानसिक तणावाचा सामना करावा लागत आहे. रोटरी क्लबने स्थापन केलेले होप अँड हीलिंग युनिट अनेक मुलांसाठी चांगले उपयोगी ठरेल असे सांगितले.
सेंट जर्मन इंडियन हायस्कूलचे चेअरमन उदय इडगल यांनी, होप अँड हीलिंग युनिट स्थापन करण्यासाठी सेंट जर्मन इंडियन हायस्कूलची निवड केल्याबद्दल समाधान व्यक्त करून रोटरी क्लब दर्पणचे आभार मानले. रोटरीच्या समाजाभिमुख कार्याची प्रशंसा करून त्यासाठी शाळेतर्फे रोटरी क्लबला सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी रोटरी असिस्टंट गव्हर्नर रेणू कुलकर्णी, रोटरी दर्पण अध्यक्षा कोमल कोळीमठ, सचिव ऍड. विजयलक्ष्मी एम., महेश किवडसन्नवर, सेंट जर्मन इंडियन हायस्कूलचे चेअरमन उदय इडगल, उमेरा पटेल, ओंकार तेलकर आदी उपस्थित होते.


Recent Comments