Belagavi

बेळगावात महिला, मुलांचा छळ, मानवी तस्करीविरोधात जागृतीफेरी

Share

महिला आणि मुलांची मानवी तस्करी आणि छळ थांबवण्याबाबत जनजागृती करण्यासाठी बेळगावात आज विविध संस्थांच्या सहभागाने भव्य मूक पदयात्रा काढण्यात आली.

बेंगळूरनंतर महिला-मुलांची तस्करी, त्यांना वाममार्गाला लावणे अशा घटनात बेळगाव दुसऱ्या स्थानी आहे. तीन राज्यांच्या सीमेवर असल्याने येथे हे प्रकार वाढीस लागले आहेत. महिला बेपत्ता होण्याच्या, त्यांना वाममार्गाला लावण्याच्या प्रकरणात लक्षणीय वाढ झाली आहे. बेळगावात वाढणारी लैंगिक प्रकरणे आणि पॉस्को प्रकरणे रोखण्यासाठी जनजागृतीसाठी आज शनिवारी सकाळी मूव्हमेंट इंडिया, मुंबई, त्रिलेट मीडिया लिमिटेड आणि बेळगावच्या महिला कल्याण संस्थेतर्फे सरदार हायस्कूलपासून मूक जागृती फेरी काढण्यात आली. सीपीआय सुलेमान तहशीलदार यांनी झेंडा दाखवून फेरीला चालना दिली.

तत्पूर्वी बोलताना महिला कल्याण संस्थेचे पदाधिकारी एम. एस. चौगला म्हणाले की, महिला आणि मुलांवर होणारे अत्याचार हे संघटित गुन्हेगारी प्रकारात मोडतात. समाजासाठी ते कलंक आहेत. त्यामुळे ते नष्ट करण्यासाठी आपणही संघटित लढा दिला पाहिजे. आज दुसरा शनिवार आणि महालया अमावास्या असूनही विविध खात्यांचे अधिकारी-कर्मचारी व विविध कॉलेजचे विध्यार्थी या फेरीत सहभागी झाल्याबद्दल त्यांचे आभार मानतो असे त्यांनी सांगितले. बाईट.
फेरीला प्रारंभ होण्यापूर्वी जिल्हा बालरक्षण संस्थेच्या सिस्टर लॉरी यांनी उपस्थितांना मानवी तस्करी व मुलांवरील अत्याचार रोखण्यासंदर्भात शपथ दिली.


सरदार हायस्कूल मैदानापासून जागृती फेरीला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर कॉलेज रोड, चन्नम्मा चौक, काकतीवेस रोड, कॉलेज रोडमार्गे पुन्हा सरदार हायस्कूल मैदानावर येऊन फेरीची सांगता झाली. यावेळी जिल्हा बालरक्षण अधिकारी महांतेश बजंत्री, डॉ. पद्मराज पाटील, महिला कल्याण संस्थेच्या योजना संचालिका सुरेखा पाटील, डॉ. पूजा, सुमित, हेन्री चन्नय्या यांच्यासह लिंगराज कॉलेज, भरतेश कॉलेज, चंद्रगिरी कॉलेज, शिवबसव आयटीआय कॉलेज, सिद्दरामेश्वर कॉलेज आदी विविध शाळा-महाविद्यालयांचे विध्यार्थी, अंगणवाडी-आशा कार्यकर्त्या, महिला कल्याण संस्था व अन्य संस्थांच्या कार्यकर्त्यांनी या फेरीत सहभाग घेतला.

Tags: