Belagavi

शेतकरी आणि जनता मरेल याची काँग्रेसकडून गॅरंटी : जेडीएस नेते जी. टी. देवेगौडा यांची जहरी टीका

Share

भीषण दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकरी आणि जनतेला दिलासा देण्याचे एकही काम राज्यातील काँग्रेस सरकार करत नाहीय, शेतकरी आणि जनता मरेल याची गॅरंटी मात्र काँग्रेस सरकारने दिली आहे, अशी जहरी टीका जेडीएस नेते जी. टी. देवेगौडा यांनी केली. आपल्या पक्षाचा एकही नेता जेडीएस सोडून काँग्रेसमध्ये जाणार नाही असा दावाही त्यांनी केला.

कर्नाटकात जेडीएसचे संघटन मजबूत करण्यासाठी पक्ष कार्यकारिणी सदस्यांनी राज्यभर दौरा सुरु केले आहेत. यानिमित्त आज बेळगावात आगमन झाल्यानंतर जी. टी. देवेगौडा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, एकीकडे राज्यात भीषण दुष्काळ पडला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात आहेत. विजेअभावी त्यांच्या संकटात आणखी वाढ झाली आहे. पाच हमींमुळे विकासकामांवर, वीजपुरवठा, पीक नुकसान भरपाईवर उपाय करण्यासाठी पैसे नसल्याचे सरकार म्हणते. त्यामुळे त्यांचेच आमदार नाराज आहेत. बी. आर. पाटील यांनी, पाच गॅरंटी का दिल्या, आम्ही त्या मागितल्या होत्या का असा सवाल करून नाराजी व्यक्त केलीय. राजू कागे यांनी वीज टंचाईवर नाराजी व्यक्त केलीय. आमदार रायरेड्डी, गणेश यांनी या सरकारला एक विजेचा खांब बसवता येत नाही अशी टीका केलीय. काँग्रेसचेच आमदार सरकारच्या कामगिरीवर नाराज आहेत. सेंट्रल ग्रीडकडून वीज का खरेदी करू नये? असा सवाल जी. टी. देवेगौडा यांनी केला.

जेडीएसचा एकही नेता पक्ष सोडून जाणार नाही. काँग्रेसवाले ६ महिन्यांपासून अशी आवई उठवत आहेत, त्यात दम नाही असे जी. टी. देवेगौडा यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान मोदी देशाचे चांगले नेतृत्व करत आहेत, ते पुन्हा पंतप्रधान व्हावेत, राज्यात कुमारस्वामी यांचे सरकार पुन्हा सत्तेत यावे यासाठी जेडीएसने भाजपसोबत युती केली आहे. त्यावर कोणी नाराज नाही असा दावा त्यांनी केला. बेंगळुरात प्राप्तिकर खात्याच्या छाप्यात एका कंत्राटदाराच्या फ्लॅटमध्ये ४२ कोटी रुपये सापडले, या कारवाईचे स्वागत करतो असे सांगून, अवैध मार्गाने पैसे जमवणाऱ्यांवर अशी कारवाई झाली पाहिजे असे देवेगौडा म्हणाले.

राज्यात जेडीएसचे संघटन पुन्हा मजबूत करण्याचा निर्णय पक्षाच्या कार्यकारिणीने घेतला आहे. त्यादृष्टीने राज्यभरात दौरे करण्यात येत असल्याचे सांगून देवेगौडा म्हणाले की, कल्याण कर्नाटकात कलबुर्गी येथून दौऱ्याला प्रारंभ केला असून, कोप्पळ, विजयपूर, हुबळी येथे दौरा करून कित्तूर कर्नाटक भागाच्या दौऱ्यासाठी आज बेळगावात आलो आहोत. जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेसच्या विरोधात या पक्षाची स्थापना केली होती. त्यांच्यानंतर माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी हा पक्ष टिकवून ठेवला आहे. काही कारणाने यावेळी आम्हाला कमी, १९ जागा मिळाल्या. पण भविष्यात बहुमत मिळवून सत्तेत येण्याचा निर्धार पक्षाने केला असून त्यासाठी राज्यभर दौरे करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जेडीएस बेळगाव जिल्हाध्यक्ष शंकर माडलगी व अन्य नेते उपस्थित होते.

Tags: