कांतराज आयोगाचा अहवाल लागू करावा आणि मुस्लिमांसाठी 2 बी आरक्षण वाढवून 8 टक्के करावे या मागण्यांसाठी सोशल डेमॉक्रेटिक पार्टी ऑफ इंडियातर्फे बेळगावात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले.
कांतराज आयोगाने 2015 मध्ये दिलेला अहवाल स्वीकारून तो जाहीर करावा तसेच मुस्लिमांसाठीचे रद्द केलेले 2 बी आरक्षण पुन्हा लागू करून ते 8 टक्के करण्याची मागणी एसडीपीआयने केली आहे. या मागणीसाठी आज गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
यावेळी बोलताना एसडीपीआयचे नेते म्हणाले की, निवडणुकीवेळी काँग्रेस नेत्यांनी, आपण सत्तेवर आल्यास कांतराज अहवाल लागू करू. त्याचप्रमाणे मुस्लिमांसाठी २(ब) आरक्षण बहाल करण्याचे आश्वासन दिले होते. पण सत्तेवर येऊन चार महिने उलटून गेले तरी काँग्रेस सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही, हे निषेधार्ह आहे, असे ते म्हणाले.
एसडीपीआयचे नेते अब्दुल माजिद म्हणाले की, मुस्लिमांसाठी 2 बी आरक्षण वाढवून 8 टक्के करावे. त्याद्वारे निवडणुकीपूर्वी अल्पसंख्याकांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्याच्या दिशेने काम करावे. सामाजिक न्याय आणि सर्व घटकांच्या कल्याणाचा हेतू असलेल्या कांताराजू आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन देणारी काँग्रेस आपल्या आश्वासनापासून दूर जात असल्याची तक्रार त्यांनी केली. सरकारने तत्काळ जागे होऊन दिलेले आश्वासन पूर्ण न केल्यास एसडीपीआय येत्या काही दिवसांत राज्यभर तीव्र संघर्ष छेडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एसडीपीआय नेते तबरेजा शेख, झाकीर नायकवडी, अश्रफ फिरकोटे, इम्रान अत्तार, मलीकजान, महमद ताहिर आदी आंदोलनात सहभागी झाले होते.


Recent Comments