देशाच्या पंतप्रधानांशी एका सामान्य नागरिकानं भररस्त्यात हस्तांदोलन करण्यास नकार देऊन त्यांना तोंडावर सुनावलं असं कुणी म्हटलं तर कदाचित विश्वास बसणं कठीण होईल. पण कॅनडामध्ये असं घडलंय. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना टोरंटोमध्ये एका सामान्य नागरिकानं चक्क तोंडावर “तुम्ही देशाचं वाट्टोळं केलं” असं सुनावलं.
यासाठी देशात वाढलेली महागाई, युक्रेनला केलेली आर्थिक मदत या गोष्टी कारणीभूत ठरल्याचं त्या व्यक्तीचं म्हणणं होतं. विशेष म्हणजे, पंतप्रधान जस्टिन ट्रुडो तिथल्या तिथे त्या व्यक्तीच्या आक्षेपांना उत्तरही देऊ लागले. शेवटी त्यांनी दिलेल्या व्लादिमिर पुतीन यांच्या संदर्भावरही सोशल मीडियावर बरीच चर्चा होताना दिसत आहे.
नेमकं काय घडलं?
एका कार्यक्रमानिमित्त जस्टिन ट्रुडो टोरंटोमध्ये आले होते. कार्यक्रमानंतर तिथून निघताना बाहेर त्यांना पाहायला आलेल्या नागरिकांना अभिवादन करत जात होते. यावेळी त्यांनी एका चिमुकल्या मुलीशीही संवाद साधला. पण तिथून पुढे जाताना एका व्यक्तीनं त्यांना तोंडावर “मी तुमच्याशी हस्तांदोलन करणार नाही, तुम्ही देशाचं वाट्टोळं केलं”, असं ऐकवलं. हे ऐकून पंतप्रधानांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांबरोबरच खुद्द जस्टिन ट्रुडो हेही आश्चर्यचकित झाले!
दरम्यान, जस्टिन ट्रुडोंनी तिथेच त्या व्यक्तीला “मी या देशाची कशी वाट लावली?” असा प्रश्न विचारत संवाद सुरू केला. त्यावर “इथे कुणी साधं घर विकत घेऊ शकतं का? तुम्ही लोकांवर कार्बन टॅक्स लावला. पण तुमच्याच ताफ्यात ९ व्हीएट कार्स आहेत”, असं म्हणत ट्रुडोंच्या ताफ्यात असणाऱ्या गाड्यांव त्यानं आक्षेप घेतला. देशातल्या गृहनिर्माण क्षेत्रातील समस्यांवरही प्रश्न केला.
त्या व्यक्तीच्या प्रश्नावर ट्रुडोंनी समजवायला सुरुवात केली. “तुम्हाला माहितीये का की तुम्ही दिलेल्या कार्बन टॅक्सच्या पैशांचं आम्ही काय करतो? आम्ही प्रदूषणावर कर आकारतो आणि ते पैसे तुमच्यासारख्या कुटुंबांकडेच परत पाठवतो”, असं ट्रुडोंनी सांगितलं. पण यानं त्या व्यक्तीचं समाधान झालं नाही. हा सगळा पैसा युक्रेनला पाठवताय, असा आरोप त्यानं केल्यानंतर ट्रुडोंनी “तुम्ही व्लादिमिर पुतीन यांचं खूप ऐकता वाटतं. तुमच्याकडे रशियाबद्दल खूप सारी चुकीची माहिती आहे”, असं म्हणत ट्रुडो तिथून निघून गेले.
हा सारा संवाद व्हिडीओमध्ये रेकॉर्ड झाला असून हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही नेटिझन्स ट्रुडोंनी रशियाबाबत बोलणं चुकीचं होतं असं म्हणत आहेत, तर काही नेटिझन्स त्यांच्या सामान्य नागरिकाशी मुद्द्यांवर संवाद साधण्याचं कौतुकही करत आहेत.
Recent Comments