Banglore

जेडीएसनंतर भाजपमध्येही युतीवरून असंतोष; सदानंद गौडा यांची नाराजी

Share

भाजपशी युती केल्यावरून जेडीएसच्या बिनीच्या नेत्यांनी पक्षाशी काडीमोड घेतल्यानंतर या युतीवरून भाजपमध्येही अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. जेडीएससोबत युती करताना पक्षाच्या वरिष्ठांनी कर्नाटक भाजपच्या एकही नेत्याला विश्वासात घेतले नसल्याची खदखद माजी मुख्यमंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी बोलून दाखवली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना डी. व्ही. सदानंद गौडा म्हणाले की, पक्षाच्या हायकमांडने जेडीएस सोबत युती करताना राज्य भाजपच्या एकही नेत्याशी चर्चा केली नाही. त्याशिवाय विरोधी पक्षनेता निवडण्यासही हायकमांड विलंब करत आहे हे वेदनादायी आहे.

भाजपसोबतच्या युतीच्या निषेधार्थ जेडीएस पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी एकामागून एक राजीनामे देत पक्ष सोडला आहे. आता जेडीएससोबतची युती भाजपमध्येही खटकू लागली आहे. माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी हायकमांडच्या जेडीएससोबतच्या युतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

खासदार डीव्ही सदानंद गौडा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेडीएस पक्षासोबत युती करण्याबाबत दिल्लीतील भाजप नेत्यांनी आमच्या कर्नाटक भाजप नेत्याशी चर्चा केलेली नाही. आम्हाला डावलून निर्णय घेतला अशी नाराजी व्यक्त केली.

माजी मंत्री ईश्वरप्पा यांनी यावरून नाराजी व्यक्त केळ्यापाठोपाठ सदानंद गौडा यांनीही आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली. प्रदेश भाजप नेतृत्व, विरोधी पक्षनेता निवडीसाठी पक्ष हायकमांड दिरंगाईचे धोरण अवलंबत आहे, एवढा विलंब झाला हे खरोखरच वेदनादायी आहे. मी आमच्या वरिष्ठांना आवाहन करतो. विरोधी पक्षनेते आणि प्रदेशाध्यक्षाची निवड लवकरच करा. यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे ज्येष्ठांनी द्यावीत, अशी मागणी डीव्ही सदानंद गौडा यांनी केली.

Tags: