Belagavi

8 ऑक्टोबर रोजी बेळगावात वीरभद्रेश्वर जयंतीचे आयोजन

Share

वीरशैव लिंगायत वेदिकेच्या वतीने 8 ऑक्टोबर रोजी बेळगावात वीरभद्रेश्वर जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे. जयंतीचे उद्घाटन केएलईचे कार्याध्यक्ष माजी राज्यसभा सदस्य डॉ. प्रभाकर कोरे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कर्नाटक राज्य माध्यान्ह आहार संघाचे राज्याध्यक्ष व हुक्केरी हिरेमठाचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी दिली.

बेळगावात आज पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी म्हणाले की, वीरशैव लिंगायत संघटनेने बेळगावात वीरभद्रेश्वर जयंती 8 ऑक्टोबर रोजी आयोजित केली आहे. वीरभद्रेश्वर हे केवळ वीरशैव समाजापुरते मर्यादित नाही, सर्व समाजाचे ते आराध्य दैवत आहे. बेंगळूर येथे गेल्यावर्षी प्रदीप कंकणवाडी यांच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम राज्यस्तरीय वीरभद्रेश्वर जयंती साजरी करण्यात आली. यंदा ती बेळगावात होत आहे.

बेळगाव येथे ८ ऑक्टोबरला होणाऱ्या या जयंती कार्यक्रमामध्ये उज्जैन जगद्गुरू, श्रीशैल जगद्गुरू, काशी जगद्गुरू, निडसोशी जगद्गुरू, शिरहट्टी जगद्गुरू, हुबळी मुरूसावीर मठाचे जगद्गुरू आणि बेळगाव जिल्ह्यातील मंत्री, आमदार आणि राज्याबाहेरील शेकडो स्वामीजी सहभागी होणार आहेत.

कारंजी मठाचे गुरूसिद्ध स्वामी म्हणाले की, बेळगावात वीरशैव लिंगायत वेदिकेच्या वतीने 8 ऑक्टोबर रोजी आयोजित वीरभद्रेश्वर जयंती कार्यक्रमात वीरशैव लिंगायतांना ओबीसी आरक्षण देण्याची मागणी करण्यात येणार आहे. यावेळी अनेक मठाधीश, स्वामीजी सहभागी होणार आहेत.
पत्रकार परिषदेला माजी आमदार विश्वनाथ पाटील, अशोक पुजारी, सुभाष पाटील यांच्यासह वीरशैव लिंगायत वेदिकेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: