Belagavi

सांबरा विमानतळावरून बेळगाव-दिल्ली विमानसेवा पुन्हा सुरू

Share

राज्याची दुसरी राजधानी बेळगाव आणि देशाची राजधानी दिल्ली दरम्यानची थेट विमानसेवा पुन्हा सुरू झाली आहे. इंडिगो कंपनीची ही उड्डाणसेवा बेळगावजवळच्या सांबरा विमानतळावर सुरू करण्यात आली आहे.

दिल्लीहून बेळगावात पहिल्यांदा लँड झालेल्या फ्लाइटमध्ये 116 प्रवासी होते. येथून 135 जण एकाच फ्लाइटने दिल्लीला गेले. गुरुवारी दुपारी ३.४५ वाजता येथील सांबरा विमानतळावर उतरलेल्या विमानाला वॉटर कॅननची सलामी देण्यात आली.

इंडिगो एअरलाइन्सच्या बेळगाव-दिल्ली विमानसेवेचे दीप प्रज्वलनाने उद्‌घाटन करून बोलताना राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांनी, जिल्ह्यातील जनतेची अनेक वर्षांपासूनची मागणी आता पूर्ण झाली आहे. हे विमानतळ फायदेशीर होण्यासाठी अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. आता अवघ्या अडीच तासांत दिल्ली गाठणे शक्य होणार आहे.

शहराच्या विकासाच्या दृष्टीने हा चांगला प्रयत्न आहे. सांबरा विमानतळाच्या विकासासाठी आवश्यक असलेली जमीन देण्याची मागणी त्यांनी जिल्ह्याचे पालक मंत्री सतीश जारकीहोळी आणि महिला व बालविकास विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्घाटन समारंभाला खासदार मंगल अंगडी, आमदार आसिफ सेठ, कर्नाटक सरकारचे दिल्ली विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, विमानतळ संचालक त्यागराजन, पायलट अक्षय पाटील, सांबरा विमानतळ प्राधिकरणाचे सल्लागार सदस्य संजय भंडारी, इरण्णा दयेन्नावर, अनुप काटी, गुरुदेव पाटील, प्रियंका आजरेकर, ज्योती शेट्टी, भाजपचे माध्यम प्रमुख शरद पाटील आदी उपस्थित होते.

Tags: