समाजाचे आणि पर्यायाने देशाचे आरोग्य सदृढ राखण्यात फार्मासिस्ट्सचे योगदान मोठे आहे असे गौरवोद्गार बेळगाव विभागीय औषध नियंत्रक मल्लिकार्जुन के. एस. यांनी काढले.
बेळगावात केएलई विद्यापीठाच्या सभागृहात आज, सोमवारी जागतिक फार्मासिस्ट्स दिन साजरा करण्यात आला. केएलई फार्मसी कॉलेज, औषध नियंत्रण विभाग आणि बेळगाव जिल्हा फार्मासिस्ट्स संघटनेच्या वतीने त्याचे आयोजन केले होते.
त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ड्रग कंट्रोलर मल्लिकार्जुन के. एस. पुढे म्हणाले की, देशाच्या आरोग्य यंत्रणेत फार्मासिस्ट्सची भूमिका नेहमीच मोठी राहिली आहे. आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर्स, तज्ञांसमवेत फार्मासिस्ट्स देखील नवनवीन औषधे आणि उपचार पद्धतीचे आविष्कार घडवून आणण्यात महत्वाची भूमिका बजावत आहेत.
त्यांच्या या योगदानाचा गौरव करण्यासाठी जागतिक पातळीवर वर्ल्ड फार्मासिस्ट्स डे साजरा करण्याची संकल्पना जागतिक फार्मासिस्ट्स संघटनेच्या तुर्कस्थानातील इस्तंबूलमध्ये 2009मध्ये झालेल्या जागतिक परिषदेवेळी मांडण्यात आली.
त्यानंतर 2010 पासून जगभरात हा दिन साजरा करण्यास प्रारंभ झाला. भारतात 2013 पासून वर्ल्ड फार्मासिस्ट्स डे साजरा करण्यास प्रारंभ झाला. आजच्या युगात आरोग्य क्षेत्रात नवनवीन रोगांची आव्हाने पुढे येत आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी फार्मासिस्ट्सनी मजबूत योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बेळगाव जिल्हा फार्मासिस्ट्स संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील ज्येष्ठ फार्मासिस्ट्स अमृत माहेश्वरी (महेशवाड, ता. अथणी), मनोज मालगत्ती, गुरुराज कुलकर्णी, राजू बनकर, सानिकोप्प आदींचा संघटनेच्या वतीने शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी केएलई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. एस. गणाचारी, केएलई फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुनील जलालपुरे, मनोहर के. व्ही., डॉ. व्ही. एस. मल्लुर, अजय मुडलगी, रेणुकाप्रसाद एम. यु., प्रा. एम. बी. पाटील, विष्णू कंग्राळकर यांच्यासह बेळगाव जिल्हा फार्मासिस्ट्स असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.


Recent Comments