Belagavi

पालिका आयुक्त अशोक दुडगंटी यांनी केली मिरवणूक मार्गाची पाहणी

Share

अनंत चतुर्दशी जवळ आल्याने बेळगाव महापालिकेने विसर्जन मिरवणुकीची तयारी युद्धपातळीवर सुरु केली आहे. पालिका आयुक्त अशोक दुडगंटी यांनी आज मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत श्री विसर्जन मिरवणूक मार्गाची पायी फिरून पाहणी केली आणि सर्व समस्या सोडवण्याचे आदेश अभियंत्यांना दिले.

पालिका आयुक्त अशोक दुडगंटी यांनी आज, रविवारी आधी कपिलतीर्थ येथील नवीन आणि जुन्या विसर्जन तलावाला भेट देत पाहणी करून दोन्ही तलावांवर अधिकाऱ्यांना योग्य ती व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर त्यांनी विसर्जन मार्गावरील समस्या समजावून घेतल्या.
रविवारी दुपारी मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रणजित चव्हाण-पाटील, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी आणि सचिव महादेव पाटील यांच्यासह मनपा आयुक्तांनी संपूर्ण मिरवणूक मार्गावर एकही दगड आणि इमारत बांधकामाचे साहित्य दिसता कामा नये, याची पुरेपूर काळजी घ्यावी तसेच मिरवणुकीच्या मुख्य मार्ग यासह समांतर रस्त्यावर हायमास्ट, बल्ब, फ्लड लाईटची व्यवस्था करण्याची सूचना मनपांच्या अभियंत्यांना दिली.

गणेश भक्तांसाठी चौकाचौकात पाणपोईची सोय, फिरती शौचालये द्या, अशी सूचना देऊन आयुक्तांनी अग्निशामक दल आणि ऍम्ब्युलन्स थांबण्याच्या जागा निश्चित करून दिल्या. याशिवाय धर्मवीर संभाजी चौकात प्रेक्षक गॅलरी उभी केली जाणार आहे. मुख्य गणेश विसर्जन मार्गावर तत्काळ स्वच्छता पथकांची नियुक्ती केली जाणार आहे. यावर्षीही नेहमीप्रमाणे गणेश मूर्ती विसर्जनासाठी क्रेन आणि स्विमर्स क्लबकडून खास स्विमर्सची सोय करण्यात आली आहे.
पाहणी दरम्यान मनपा आयुक्तांनी शनी मंदिर सर्कल, हेमु कलानी चौक येथे मोठे हाय मास्ट बसवण्यास सांगितले. तसेच शनी मंदिर सर्कलजवळील तांत्रिक अडथळा दूर करून चौगुले यांना बांधकाम परवानगी देतो असे सांगत भिंत हटविण्याच्या सूचना दिल्या. रामलिंग खिंड गल्ली, टिळक चौक किर्लोस्कर रोडसह हुतात्मा चौक मार्गावर त्यांनी पायी फिरून पाहणी केली. रामदेव गल्ली येथील खुल्या गटारी झाकण्याची सूचना केली. मारुती गल्ली, मार्केट परिसरातील गणेश मंडळांना भेटी देत गणपत गल्लीतील खराब रस्ता दुरुस्त करण्याचे आदेश दिले. यावेळी पाहणी दौऱ्यात पालिकेच्या आरोग्य, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते व अधिकारीही सहभागी झाले होते.

Tags: