बेळगावात राज्य ग्राहक आयोगाचे पीठ मंजूर होऊन 2 वर्षे लोटली तरी अद्याप इमारतीअभावी ते कार्यान्वित झालेले नाही. त्यामुळे येत्या 8 दिवसांत आयोगाच्या पीठाला इमारत उपलब्ध करून द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बेळगावातील वकिलांनी जिल्हा प्रशासनाला दिलाय.
बेळगावात राज्य ग्राहक आयोगाचे कायमस्वरूपी पीठ स्थापन करण्याची वकिलांची जुनी मागणी आहे. त्यासाठी अनेकवेळा मोर्चे, आंदोलने झाली. त्यावेळच्या मंत्री-आमदारांनी देखील या मागणीला पाठिंबा दिला. अखेर मागील भाजप सरकारच्या काळात राज्य ग्राहक आयोगाचे कायमस्वरूपी पीठ बेळगावात मंजूर होऊन इमारत निश्चित करण्याची शिफारस करण्यात आली.
मात्र या गोष्टीला 2 वर्षे लोटली तरी अद्याप इमारतीअभावी ग्राहक पीठ कार्यान्वित झालेले नाही. त्यामुळे आज बेळगावातील वकिलांनी ऍड. एन. आर. लातूर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाला याबाबतचे निवेदन सादर केले.
या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना ऍड. एन. आर. लातूर यांनी सांगितले की, राज्य ग्राहक पीठामुळे उत्तर कर्नाटकातील जनतेची चांगली सोय होणार आहे. त्यामुळे ते लवकरात लवकर कार्यान्वित होणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांकरवी सरकारला निवेदन दिले आहे. याबाबत आम्ही यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यांनी जागा मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला स्थळनिश्चितीची सूचना करणारे पत्र लिहिले आहे. बांधकाम खात्याने याबाबत चालढकल चालवली आहे. त्यामुळे आज पुन्हा निवेदन दिले आहे. जर येत्या 8 दिवसांत ग्राहक पीठाला इमारत उपलब्ध करून दिली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी एस. आर. कोलकार, आर. के. नाशी, एस. एस. देसाई, के. ए. दळवी, पी. व्ही. पवार, पी. एस. नाईक, गजानन पाटील, एम. व्ही. कौजलगी आदी वकील उपस्थित होते.


Recent Comments