अनुचित प्रकारांना वाव न देता गणेशोत्सव सुरळीत साजरा करा, काही अडचण असेल तर महामंडळाशी संपर्क साधा असे आवाहन मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी केले.
बेळगावात रेल्वे ओव्हरब्रिजजवळील मराठा मंदिरामध्ये बेळगाव शहरातील गणेशोत्सव महामंडळाची व्यापक बैठक आज, रविवारी पार पडली. त्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर म्हणाले की, बेळगावातील गणेशोत्सवाला 1905 पासूनची परंपरा आहे. महामंडळही गणेशोत्सव शांततेत, सुरळीत पार पडावा यासाठी प्रयत्नशील असते. यात आजपर्यंत कोणीही कसलेही राजकारण केलेलं नाही अन करूही नये. उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी विविध मागण्या आम्ही प्रशासनाकडे केल्या होत्या.
त्यांची दखल घेऊन अधिकारी अडचणी, समस्या सोडवून सोयी-सुविधा उपलब्ध करून देत आहेत. त्याबद्दल यांचे अभिनंदन. बेळगावातील गोरगरिबांची मुले या उत्सवात जल्लोषाने सहभागी होतात. कोणाच्या तरी नाहक चुकीमुळे त्यांना त्रास होऊ नये, कोणावर खटले दाखल होऊ नयेत असे वर्तन सगळ्यांनी उत्सवकाळात ठेवावे. उत्सव मंडळांनी काहीही समस्या असल्यास महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संपर्क साधावा, जर त्यांचे फोन लागत नसतील तर थेट माझ्याशी संपर्क साधा, मी तुमच्यासाठी 24 सदैव उपलब्ध राहीन अशी ग्वाही त्यांनी दिली.
मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे सरचिटणीस रणजीत चव्हाण-पाटील यावेळी म्हणाले की, बेळगाव शहरात सुमारे तीनशेहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. ती सर्व महामंडळाचा आदेश मानतात. त्यामुळे बऱ्याचदा पोलीस आणि प्रशासकीय अधिकारीही, मंडळे आमचे ऐकणार नाहीत, तुम्हीच त्यांना सांगा असे आम्हाला खासगीत सांगतात. उत्सव मंडळांनीही केवळ गणेशोत्सवाच्या 15 दिवसांत महामंडळाच्या संपर्कात न राहता वर्षभर संपर्कात राहिले पाहिजे.
समाजातील अनिष्ट प्रथा दूर करणे हा गणेशोत्सवाचा खरा हेतू आहे. तो तडीस नेण्यासाठी उत्सव मंडळांनी महामंडळाच्या वर्षभर संपर्कात राहिले पाहिजे. विसर्जनादिवशी श्रीमुर्ती वेळेत मंडपाबाहेर काढून मिरवणूक वेळेत संपविणे गरजेचे आहे. हल्ली 40% मूर्ती तर मुख्य मिरवणुकीऐवजी थेट विसर्जनाला जात आहेत. तरीही मिरवणूक संपायला दोन दिवस का लागतात याचा सर्वानी विचार केला पाहिजे. आपल्या संस्कृतीनुसार भक्तिमय गाणी लावून मिरवणूक वेळेत काढून वेळेवर सांगता करावी असे आवाहन त्यांनी केले.
शहापूर विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव यावेळी म्हणाले की, बेळगाव शहर आणि शहापूर विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ गणेशोत्सव, विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी समन्वयाने काम करत आहे. मंडळांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा पाठपुरावा करून त्या सोडविण्यासाठी महामंडळे कार्यरत आहेत. महापालिका, महामंडळ आदींकडून विसर्जन मिरवणूक मार्ग, तलावांची पाहणी आदींबाबत शहापूर विभाग महामंडळाला पूर्वसूचना द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणूक शांततेत व वेळेत पार पाडण्यासाठी मंडळांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बेळगाव तसेच शहापूर विभागातील गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विविध सूचना केल्या. मंडळांच्या विविध समस्यांवर यावेळी व्यापक चर्चा करण्यात आली. बैठकीला महामंडळ पदाधिकारी महादेव पाटील, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, दत्ता जाधव., सागर पाटील, म. ए. युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, नगरसेविका वैशाली भातकांडे, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, माजी नगरसेवक रमेश सोनटक्की, अशोक चिंडक यांच्यासह विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments