काँग्रेस सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ भाजप रयत मोर्चा व अन्य घटकांच्या वतीने चाबूक मोर्चा काढून बेळगावजवळील पंत बाळेकुंद्री येथे राष्ट्रीय महामार्ग रोखून आंदोलन करण्यात आले.

सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार सत्तेवर येऊन 3 महिने झाले. त्यांनी राज्यातील जनतेला 5 गॅरंटी दिल्या आहेत. परंतु शेतीला अपुरा वीजपुरवठा करणे, शेतकरी हिताच्या योजना बंद करणे असे शेतकरी विरोधी धोरण अवलंबत आहे असा आरोप करून भाजप रयत मोर्चा कार्यकर्त्यांनी राज्याध्यक्ष खासदार इरण्णा कडाडी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडले. बैलगाड्या आणि ट्रॅक्टरमधून आलेल्या शेतकरी व कार्यकर्त्यांनी हवेत चाबूक उगारून सरकारला इशारा दिला.
यावेळी बोलतांना रयत मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष व राज्यसभा खासदार इरण्णा कडाडी म्हणाले की, या वर्षी पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या जमिनीत उगवलेली पिके नष्ट होत आहेत. विहिरी व कूपनलिकामध्ये पाणी असले तरी, वीज उपलब्ध नसल्याने ते उपसा करून पिकांना देता येत नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. पूर्वीच्या भाजप सरकारकडून केंद्र सरकारच्या किसान सन्मान योजनेच्या 6 हजार रुपयांत राज्य सरकारच्या वाट्याचे 4 हजार रु. मिसळून शेतकऱ्यांना एकूण 10हजार रु. दिले जात होते. मात्र कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर राज्य सरकारच्या वाटणीचे 4हजार रुपये देणे थांबवले आहे. शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिष्यवृत्ती निधीतील 560 कोटींचा निधी थांबवला आहे. कर्नाटकातील किसान कार्ड मिळवणाऱ्या 50 लाख शेतकऱ्यांना 10000 रु. अनुदान थांबले आहे. कर्नाटकातील काँग्रेस सरकार राज्यातील सर्व शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. शेतकऱ्यांसाठी दिवसाचे २४ तास पुरेशी वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
भाजप बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी राज्यातील काँग्रेस सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करून, शेतीला अखंड सात तास दिवस वीज देण्याची मागणी केली. ते म्हणाले की, शेतकर्यांना उपलब्ध वीज मध्यरात्री 01 किंवा 02 तास पुरवली जाते. त्यासाठी दिवसाचे २४ तास शेतकऱ्यांना शेतातच घालवावे लागत आहेत असे ते म्हणाले.
भाजप बेळगाव ग्रामीण मंडळचे अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले की, राज्य सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत असून कर्नाटक राज्यातील काँग्रेस सरकार झोपी गेले आहे. उद्यापासून 7 तास वीज पुरवठा करण्यात यावा, अन्यथा आम्ही बेमुदत उपोषण करू असा इशारा दिला. .
बेळगाव-बागलकोट रस्त्यावर बसून शेकडो शेतकऱ्यांनी किमान दीड तास रस्ता रोको आंदोलन करत सरकार विरोधी घोषणा दिल्या, सर्व शेतकरी बैलगाड्या चाबूक आणि ट्रॅक्टर घेऊन आंदोलनाला पोचले होते. या आंदोलनाला युवराज जाधव, शंकर मल्लन्नवर, मलिकार्जून माद्दन्नावर, तिप्पाजी मोरे, भरमा गोमान्नाचे, शहाजी जाधव, पंकज घाडी, प्रदीप सन्नीकोप्प, शशीमाऊली कुलकर्णी, नारायण पाटील आदींसह शेकडो कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते, याप्रसंगी हेस्कॉमचे अधिकारी उपस्थित होते, त्यांनी निवेदन स्वीकारून उद्यापासून दिवसा 7 तास विद्युत पुरवठा करण्याचे आश्वासन दिले, याप्रसंगी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.


Recent Comments