Belagavi

बेळगावात भाजप रयत मोर्चाकडून सरकारविरोधात आंदोलन

Share

राज्यातील काँग्रेस सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या रयत मोर्चाच्या वतीने बेळगावात आज आंदोलन छेडण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून पूर्वीच्या भाजप सरकारने आणलेल्या शेतकरी हिताच्या योजना सुरूच ठेवण्याची मागणी करण्यात आली.

यंदा पाऊस कमी झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. त्यांची मदत करण्याऐवजी राज्य सरकार शेतकरी विरोधी धोरण राबवत आहे, दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी राज्यातील काँग्रेस सरकार पूर्वीच्या भाजप सरकारने लागू केलेल्या शेतकरी हिताच्या योजना बंद करण्याचा सपाटा चालवला आहे, असा आरोप करत भाजप रयत मोर्चा आणि अन्य शाखांच्या वतीने बेळगावातील चन्नम्मा चौकात आज निदर्शने करण्यात आली.

यावेळी बोलताना भारतीय जनता पक्षाचे राज्य प्रवक्ते एम. बी. जिरली म्हणाले की, भाजप रयत मोर्चाने आज बेळगाव जिल्ह्यातून काँग्रेस सरकारच्या विरोधात संघर्ष सुरू केला आहे. काँग्रेस सरकार शेतकरी विरोधी धोरणाचे अनुकरण करत आहे. पूर्वाश्रमीच्या भाजप सरकारच्या कार्यकाळात अनेक शेतकरी हिताच्या योजना आणल्या होत्या. त्या सरसकट बंद करून काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. या योजना पूर्ववत सुरु करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अवर्षणग्रस्त तालुक्यांची दुष्काळी तालुके म्हणून तातडीने घोषणा करावी. अन्यथा राज्य सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.

माजी आमदार व महानगर भाजप जिल्हाध्यक्ष अनिल बेनके म्हणाले की, सध्या समर्पक पाऊस होत नसल्याने शेतकरी पाण्यासाठी विहिरींवर अवलंबून आहेत. मात्र राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना अखंड वीज पुरवठा केला जात नाही. त्यामुळे ते संकटात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी किसान सन्मान निधीतून शेतकऱ्यांना 6 हजार रुपये देत असत, त्यामध्ये 4 हजार रुपये भर घालून भाजप सरकार दहा हजार रुपये शेतकऱ्यांना देत होते. मात्र राज्याच्या वाट्याचे पैसे सिद्धरामय्या सरकारने रोखून धरले, शेतकऱ्यांच्या हिताचा एपीएमसी दुरुस्ती कायदा रद्द केला. यातून सरकार शेतकरी विरोधी धोरण राबवत आहे हे निषेधार्ह आहे.

यावेळी भाजप नगरसेवक बैलगाडीतून आंदोलनस्थळी आले होते. राजशेखर डोनी, मंगेश पवार आदी नगरसेवक बैलगाडीत सवार झाले होते. भाजप नेते रुद्रगौडा चंदरगी, नगरसेविका सारिका पाटील, शिल्पा केकरे, कल्पना इटगी, माधवी हिरेमठ, कांचन कोपर्डे, कविता हिरेमठ, गीता सुतार, गिरीजा बन्नुरे, व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

Tags: