Khanapur

अखंड वीज पुरवठ्यासाठी खानापुरात बळीराजाचा एल्गार !

Share

शेतीसाठी अखंड सात तास वीजपुरवठा करावा, खानापूर तालुका दुष्काळपीडित जाहीर करावा आदी मागण्यांसाठी खानापुरात आज बळीराजाने एल्गार पुकारला. तहसीलदार कार्यालयावर भव्य मोर्चा काढून निदर्शने केली.

नेगीलयोगी रयत संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी खानापुरात आज तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढून आंदोलन छेडण्यात आले. जांबोटी मोर्चाला प्रारंभ झाला. त्यानंतर जोरदार घोषणा देत विविध मार्गांवरून तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. यावेळी घोषणा देत शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला.

खानापूर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, शेतीला अखंड वीजपुरवठा करावा, लंपी रोगाने मृत्युमुखी पडलेल्या गुरांची नुकसान भरपाई पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, गुरांवर योग्य उपचार करावेत, आदी मागण्या निदर्शक शेतकऱ्यांनी केल्या. यावेळी लोडशेडिंगच्या नावाखाली खंडित वीज पुरवठा करत असल्याच्या मुद्द्यावर शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले.

तहसीलदार व अधिकाऱ्यांशी बोलताना आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी देशाला अन्न देणाऱ्या शेतकऱ्याची फरफट केली जात असल्याचा तीव्र निषेध केला. अन्नदात्या शेतकऱ्याचे जगणे बेहाल करून टाकल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला. यापुढे वीज पुरवठा बंद पाडल्यास लाईनमनपासून सेक्शन अधिकाऱ्यांना झाडाला बांधून घालू असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.

नेगीलयोगी रयत संघटनेचे जिल्हाध्यक्ष रुद्रगौडा पाटील यांनी, एकवेळ उद्योगांचा वीजपुरवठा बंद करा मात्र शेतीला सात तास अखंड वीज पुरवा अशी मागणी केली. शेती-शिवारात कोसळलेले वीजखांब, ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करा, शेतकऱ्यांच्या मुलांना अभ्यासात व्यत्यय येऊ नये यासाठी सायंकाळी किमान सहा ते रात्री दहापर्यंत अखंड वीज पुरवठा करा अशी मागणी त्यांनी केली.
एकंदर, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याच्या आग्रहाखातर भव्य मोर्चा काढून शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे यावेळी दिसून आले.

Tags: