Belagavi

बेळगावात श्री विसर्जन मिरवणूक मार्गाची अधिकाऱ्यांकडून पाहणी

Share

गणेशोत्सवानिमित्त बेळगावात आज जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्तांसह विविध अधिकाऱ्यांनी मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह श्री विसर्जन मिरवणूक मार्गाची आणि कपिलेश्वर विसर्जन तलावाची पायी फिरून पाहणी करून आढावा घेतला.

बेळगावचा गणेशोत्सव संपूर्ण कर्नाटकात आणि पश्चिम महाराष्ट्रात एक भव्य उत्सव म्हणून ओळखला जातो. सर्व बेळगावकर गणेशाचे स्वागत धुमधडाक्यात करून ११ दिवस त्याची श्रद्धा-भक्तीने मनोभावे सेवा करून अनंत चतुर्दशीला तितक्याच भक्तीने पण जड अंतकरणाने बाप्पाला पूढच्या वर्षी लवकर या असा प्रेमळ निरोप देतात. बेळगाव शहर व उपनगरात तीनशेहून अधिक सार्वजनिक उत्सव मंडळे आहेत.

इतक्या भव्य प्रमाणात शहरात हा उत्सव होत असल्याने महापालिका, जिल्हा प्रशासनाकडूनही त्याची जय्यत तयारी करण्यात येते. या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा, पालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्यासह प्रशासन, पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांनी मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह शहरातील विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाची तसेच श्री विसर्जन तलावांची पायी फिरून पाहणी केली.

यावेळी चन्नम्मा चौकापासून तसेच हुतात्मा चौकापासून कपिलेश्वर तलावापर्यंतच्या विसर्जन मिरवणूक मार्गावरचे खड्डे बुजविणे, अडथळे हटविण्याच्या तसेच लोंबणाऱ्या वीजवाहिन्या दुरुस्त करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी महापालिका व हेस्कॉम अधिकाऱ्यांना दिल्या.

या दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले की, जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच महापालिकेत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक झाली. त्या बैठकीत मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचना विचारात घेऊन झालेल्या निर्णयानुसार आज आम्ही विसर्जन मिरवणूक मार्गाची तसेच तलावांची पायी फिरून पाहणी केली आहे.

महापालिकेतर्फे गणेशोत्सवासाठी आवश्यक कामे युद्धपातळीवर राबवण्यात येत आहेत. उत्सवापूर्वी ती सर्व कामे पूर्ण करण्यात येतील. लोकांना विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी गॅलरी व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.

पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा म्हणाले की, विसर्जन मिरवणूक मार्गावरील वीजखांब, वीजवाहिन्यांची दुरुस्ती, खड्डे बुजविणे अतिक्रमणे हटविणे यासंदर्भात आज महापालिका व हेस्कॉम अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. हुतात्मा चौकात मिरवणूक प्रारंभ होण्याच्या ठिकाणासह सर्व मार्गाची पायी फिरून पाहणी केली असून, संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी महानगर पालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी, शहर अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर, पोलीस उपायुक्त स्नेहा पी.व्ही., एसीपी नारायण बरमनी, मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष रणजित चव्हाण-पाटील, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, लोकमान्य गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, विविध अधिकारी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: