बेळगावातील चव्हाट गल्लीतील देवदादा सासनकाठी जोतिबा देवस्थानतर्फे पवित्र श्रावण सोमवार निमित्त आज विशेष पूजा व महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता.
वाडी रत्नागिरी, कोल्हापूर येथील जोतिबा देवस्थानच्या वार्षिक चैत्र यात्रेत मानाचे स्थान असलेल्या चव्हाट गल्लीतील देवदादा सासनकाठी जोतिबा देवस्थानतर्फे आज पवित्र श्रावण मासातील सोमवारनिमित्त विशेष पूजा करून भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, माजी आमदार अनिल बेनके, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर आदी मान्यवरांच्याहस्ते त्याचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी बोलताना माजी महापौर मालोजीराव अष्टेकर म्हणाले की, बेळगाव शहरातील सर्व विधायक, सामाजिक कार्यात अग्रेसर राहण्याचा लौकिक चव्हाट गल्लीच्या प्राप्त केला आहे. आपण वैज्ञानिकदृष्ट्या कितीही प्रगती केली तरी देवापुढे झुकले पाहिजे. या दृष्टीने चव्हाट गल्लीत जोतिबा देवस्थानची स्थापना करून लोकांना भक्तिमार्गाकडे नेण्याचे मोठे काम देवदादांनी केले आहे. त्यांच्या सासनकाठीला महाराष्ट्रात मोठा मान आहे. त्यांच्या मागे चव्हाट गल्लीतील कार्यकर्त्यांनी त्यांची परंपरा पुढे सुरु ठेवली हे कार्य प्रशंसनीय आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
या प्रसंगी नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. चव्हाट गल्ली व परिसरातील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.


Recent Comments