अनेक खड्डे पडून वाहतुकीस अयोग्य बनलेल्या खानापूर-जांबोटी-कणकुंबी-चोर्ला रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी कणकुंबी येथे ग्रामस्थांनी रास्ता रोको करून जोरदार आंदोलन केले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अनेक तास ठप्प झाली होती.
बेळगाव ते गोवा हा प्रवास 40 किमीने पर्यायाने एक तासाने कमी करणाऱ्या जांबोटी-कणकुंबी-चोर्ला महामार्गावर असंख्य खड्डे पडून मोठी दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी वारंवार मागणी वाहनचालकांसह कणकुंबी, जांबोटी व परिसरातील ग्रामस्थांनी सरकारकडे केली होती. याबाबत लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना अनेकदा निवेदने, अर्ज देण्यात आले होते. मात्र त्यांना केवळ आश्वासने देण्यात आली, कृती काहीच झाली नाही. त्यामुळे कणकुंबी, पारवाड, आमटे, जांबोटी परिसरातील ग्राम पंचायत सदस्य, आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी कणकुंबी येथे रास्ता रोको करत आंदोलन छेडले. त्यामुळे दोन्ही बाजूने गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आंदोलकांनी सांगितले की, बेळगाव-चोर्ला रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून हा रस्ता वाहतुकीला अयोग्य बनला आहे. त्यामुळे त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी आम्ही अनेकदा केली होती. मात्र त्याची दखल न घेतल्याने आम्ही आज आंदोलन छेडले आहे. वाहनचालकांना यामुळे त्रास झाला असेल, पण त्यांच्यासाठीच आम्ही हे आंदोलन छेडले असल्याने त्यांनी सहकार्य करावे असे त्यांनी सांगितले.
यावेळी खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले व त्यांच्याशी चर्चा केली. लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. येत्या दोन- तीन दिवसात जर रस्ता दुरुस्त करण्यास सुरुवात झाली नाही तर या ठिकाणी पुन्हा रस्ता रोको करून उग्र आंदोलन हाती घेण्यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.
यावेळी खानापूर तहसीलदार तसेच संबंधित खात्याचे अधिकारी आणि रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर यांनी येत्या तीन दिवसात रस्ता दुरुस्तीला सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले.
Recent Comments