स्वातंत्र्यापूर्वी मुंबई प्रांतात आणि नंतर कर्नाटक पोलीस दलात काम केले. परंतु कर्नाटकात काम करताना येथील जनतेने खूप प्रेम दिले, त्यामुळे कामाचे समाधान वाटते असे शतायुषी निवृत्त पोलीस अधीक्षक गणेश बाळकृष्ण मुदलियार यांनी सांगितले.
निवृत्त पोलीस अधीक्षक गणेश बाळकृष्ण मुदलियार यांनी वयाची 100 वर्षे पूर्ण केली आहेत. त्यानिमित्त बेळगावातील पोलीस समुदाय भवनात आज, रविवारी बेळगाव जिल्हा निवृत्त पोलीस अधिकारी संघटनेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना मुदलियार पुढे म्हणाले की, कर्नाटकातील जनतेने माझ्या सेवाकाळात मला खूप प्रेम, सहकार्य दिले. त्यामुळे पोलिसी सेवा केल्याचे समाधान लाभले. अनेक वरिष्ठ, कनिष्ठ अधिकाऱ्यांनीही मोठे सहकार्य दिले. त्यामुळे या सर्वांचा मी ऋणी आहे.
यावेळी बोलताना निवृत्त आयजीपी एस. एस. पावटे म्हणाले की, त्याकाळी मुंबई प्रांतात पोलीस अधिकारी म्हणून काम करणे हे अतिशय प्रतिष्ठेचे मानले जाई. पोलीस खात्याची प्रशासकीय भाषा इंग्लिश होती. साधा पंचनामा लिहायचा तरी तो पोलीस अधिकाऱ्यानेच अशी प्रथा होती. गणेश मुदलियार यांचे इंग्लिश भाषेवर चांगले प्रभुत्व होते. त्यांनी सेवाकाळात एक निर्भीड, कठोर पोलीस अधिकारी म्हणून नाव कमावले. शतायुषी ठरलेले पोलीस अधिकारी विरळच असतात. त्यात मुदलियार यांनी स्वतःच्या शिस्तीने, हिंमतीवर हा मान मिळवला आहे. एक प्रामाणिक, कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून आजही त्यांचे नाव घेतले जाते असे त्यांनी सांगितले.
यावेळी निवृत्त पोलीस अधिकारी संघटनेतर्फे गणेश मुदलियार यांचा शाल, फळे देऊन पावटे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला निवृत्त एसपी बी. आर. मेळवंकी, निवृत्त अधिकारी एस. एस. मुरगोड, अशोक कुरेर, अशोक सदलगे,आर. बी. पाटील, एस. एच. केरी, ए. सी. अंगडी, पी. जी. वांडकर तसेच निवृत्त पोलीस अधिकारी संघटनेचे पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments