Belagavi

सहारा फौंडेशनच्या शिबिरात हजारहून अधिकजणांची नेत्र तपासणी

Share

बेळगावातील सहारा फौंडेशनच्या वतीने आज भव्य नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबीर घेण्यात आले. शिबिरात हजारहून अधिकजणांची नेत्र तपासणी करण्यात आली.

बेळगावातील अंजुमन-ए-इस्लाम संस्थेच्या सभागृहात सहारा फौंडेशनच्या वतीने आज, रविवारी भव्य नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे एक हजारहून अधिकजणांची मोफत नेत्र व मोतीबिंदू तपासणी करून त्यांना योग्य मार्गदर्शन, सल्ला देण्यात आला. बेळगावच्या विविध भागातील नागरिकांनी शिबिरात उपस्थित राहून नेत्र तपासणी करवून घेतली. बेळगाव जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था आणि केएलई प्रभाकर कोरे हॉस्पिटलच्या सहकार्याने हे शिबीर घेण्यात आले.

या संदर्भात इन न्यूजला माहिती देताना आयोजक सलमान शेख यांनी सांगितले की, सहारा फौंडेशनकडून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हे भव्य नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबीर घेण्यात येत आहे. यासाठी बेळगाव जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था आणि केएलई प्रभाकर कोरे हॉस्पिटलच्या सहकार्य लाभले आहे. पहिल्या टप्प्यात आम्ही ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठी हे शिबीर घेतले आहे.

तपासणीनंतर एका महिन्यात ज्यांना आवश्यक त्यांना चष्मे देण्यात येणार असून, मोतीबिंदू आढळलेल्यांवर केएलई प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. अलीकडे लहान मुलांनासुद्धा मोबाईलमुळे डोळ्यांचे विकार जडत आहेत.

त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात आम्ही एखाद्या मोठ्या सरकारी शाळेत सर्व शाळांच्या मुलांच्या नेत्र तपासणीचे शिबीर घेणार आहोत. तेथेही मुलांना मोफत चष्मे वाटण्यात येणार आहेत असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, शिबिरात केएलई प्रभाकर कोरे हॉस्पिटलच्या नेत्रतज्ज्ञ आणि विध्यार्थी, कर्मचाऱ्यांनी रुग्णांची नेत्रतपासणी केली. बेळगावच्या विविध भागातील नागरिकांनी शिबिरात उपस्थित राहून नेत्र तपासणी करवून घेतली.

Tags: