Belagavi

चलवादी युवा संघ बेळगाव दक्षिणचे उदघाटन अन मेळावा

Share

चलवादी युवा संघ बेळगाव दक्षिण या नव्या संघटनेचा उदघाटन समारंभ आणि चलवादी समाजाचा मेळावा बेळगावात आज पार पडला.  बेळगावातील खासबाग जुन्या पी. बी. रोडवर असलेल्या जयवंती मंगल कार्यालयात आज रविवारी चलवादी युवा संघ बेळगाव दक्षिण या नव्या संघटनेचा उदघाटन समारंभ आणि चलवादी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

तत्पूर्वी खासबागमधील प्रमुख मार्गावरून समारंभ स्थळापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची चांदीच्या रथातून भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. चलवादी समाजाच्या आबालवृद्ध नागरिकांनी त्यात निळे झेंडे हाती घेऊन जल्लोषात सहभाग घेतला.

त्यानंतर झालेल्या जाहीर समारंभात बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ, महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, नगरसेवक संदीप जिरग्याळ, मंगेश पवार, जयंत जाधव, भरत पाटील, तालुका समाजकल्याण अधिकारी महांतेश जीवुरगुंडी, अध्यक्ष यल्लापा कोलकार आदी व्यासपीठावर उपस्थित होते. आ. राजू सेठ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते समारंभाचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी बोलताना आ. राजू सेठ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अद्वितीय संविधानामुळे हजारो वर्षे पायदळी तुवल्या गेलेल्या वंचित, दलित समाजाला न्याय मिळाल्याचे सांगून त्यांची आठवण ठेवण्याचे आवाहन केले. बाबासाहेबांनी संपूर्ण जगताच आदर्श ठरेल अशी घटना लिहून सर्व भारतीयांना समानपणे जगण्याचा, शिक्षणाचा, अभिव्यक्तीचा मूलभूत अधिकार मिळवून दिला. त्यामुळे ते सदैव प्रातःस्मरणीय आहेत. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून आपण साऱ्यांनी वाटचाल करणे हे आम्हा सर्वांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.

या संदर्भात बोलताना अध्यक्ष यल्लापा कोलकार यांनी इन न्यूजला सांगितले की, बेळगाव दक्षिण मतदार संघात चलवादी समाजाचे संघटन बळकट करण्यासाठी, समाजाला सरकारी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी चलवादी युवा संघ, बेळगाव दक्षिणेची स्थापना करण्यात आली आहे.

दरम्यान, उदघाटन समारंभानंतर झालेल्या मेळाव्यात चलवादी समाजाचे संघटन बळकट करण्यासह समाजबांधवांच्या अडीअडचणी सोडविण्यासंदर्भात विचारविनिमय करून ठराव मंजूर करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी महांतेश मेगिनमनी, सविता कांबळे, श्रीशैल कांबळे, संतोष देवरमनी, महेश कोलकार यांच्यासह चलवादी समाजाचे स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: