Belagavi

लॉरीमधून लाखोंचे अवैध मद्य केले जप्त : बेळगाव अबकारी खात्याची मोठी कारवाई

Share

राष्ट्रीय महामार्गावर , सुवर्ण विधानसौधच्या पुढे लॉरीमध्ये भरलेल्या प्लायवूडच्या फळ्यांमध्ये दडवून गोव्याहून अन्यत्र नेण्यात येणारा महागड्या उंची दारूचा लाखो रुपयांचा अवैध मद्यसाठा अबकारी खात्याने जप्त केला आहे . बेळगाव सापडलेला आत्तापर्यंतचा हा सर्वात मोठा अवैध दारूचा साठा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोव्याहून एका लॉरीमधून मोठ्या प्रमाणात दारूच्या साठ्याची बेकायदा वाहतूक करण्यात येत असल्याची ,माहिती मिळताच बेळगाव अबकारी खात्याचे अधीक्षक विजयकुमार आणि उपाधीक्षक मुरगोड यांच्या मार्गदर्शनाखाली अबकारी खात्याच्या पथकाने सापळा रचून काल रात्री 3:30 वाजण्याच्या सुमारास शहर बाहेरील राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर बेळगाव सुवर्ण विधानसौधच्या थोडे पुढे अबकारी पथकाने सदर लॉरी अडवून ही मोठी कारवाई केली .

त्यानंतर अबकारी अधिकाऱ्यांनी लॉरी चालकाची चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. तेंव्हा संशयावरून सदर लॉरी बेळगाव अबकारी भवन आवारात आणण्यात आली . त्यानंतर आज शनिवारी सकाळी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींसमक्ष या लॉरीची तपासणी करण्यात आली. त्यावेळी यामध्ये भरलेल्या प्लायवूडच्या मोठ्या फळ्यांच्या साठयामध्ये आतल्या बाजूला प्लायवूड कापून निर्माण केलेल्या दोन मोठ्या कप्प्यांमध्ये महागड्या उंची दारूच्या बाटल्यांचा साठा आढळून आला. बाहेरून कोणालाही कल्पना येणार नाही अशा पद्धतीने दारूच्या बाटल्यांचे बॉक्स प्लायवूडच्या फळ्यांमध्ये दडविण्यात आले होते.जप्त करण्यात आलेल्या या लाखो रुपयांच्या दारूच्या साठ्यामध्ये ब्लेंडर स्प्राईड, सिग्नेचर वगैरे विविध प्रकारच्या महागड्या उंची दारूच्या बाटल्यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे बियरच्या बाटल्या देखील सापडल्या आहेत..

अबकारी खात्याचे संयुक्त आयुक्त मंजुनाथ यांनी अबकारी भवन आवारात माध्यमांना ह्या कारवाईची माहिती दिली. गोव्यातून परराज्यात मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे किनारपट्टीकडून येणाऱ्या सर्व वाहनांवर आम्ही पाळत ठेवली. संशयित वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये दारू आढळून आली. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील चालक वीरेंद्र याने गोव्यातून अवैधरित्या दारूची वाहतूक केल्याची कबुली दिली आहे. मात्र, ते कुठे नेत होते, हे त्यांनी सांगितले नाही त्याचप्रमाणे जप्त करण्यात आलेल्या दारूच्या साठ्याची अद्याप संपूर्ण तपासणी आणि मोजदाद करावयाची आहे. त्यामुळे त्यानंतरच जप्त केलेल्या दारूची निश्चित किंमत समजणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच बेळगावात अबकारी खात्याने आजवर जप्त केलेल्या अवैध दारू साठ्यांपैकी हा साठा सर्वात मोठा साठा असल्याचे त्यांनी सांगितले .

Tags: