Belagavi

बेळगावात शिवशरण नुली चंदय्या यांची जयंती साजरी

Share

दासोह म्हणजे केवळ जेवण नव्हे तर ते एक दार्शनिक रूप आहे हे शिवशरण नुली चंदय्या यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले असे विचार ज्येष्ठ साहित्यिक रमजान दर्गा यांनी व्यक्त केले.
बेळगावातील कुमार गंधर्व कला रंगमंदिरात आज गुरुवारी बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड व संस्कृती विभाग आणि कोरम (वाजंत्री) समाजातर्फे शिवशरण नुली चंदय्या यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना ज्येष्ठ कन्नड साहित्यिक रमजान दर्गा पुढे म्हणाले की, बजंत्री समाज अनेक प्रकारची कष्टाची कामे करून उदरनिर्वाह करतो हे मी स्वतः पाहिलेले आहे. केवळ वाद्ये वाजविणेपुरती मर्यादित न राहता शेतीसह अनेक कष्टाची कामे हा समाज करतो. या समाजाला शिवशरण नुली चंदय्या यांची कष्टातून चरितार्थ चालवण्याची भव्य परंपरा लाभली आहे. शिवशरण नुली चंदय्या यांचा खुद्द बसवण्णांनीही गौरव केला होता. इतके त्यांचे कार्य महान आहे. बदलत्या काळानुरूप या समाजाने शिक्षणाला महत्व देऊन प्रगती साधावी असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर पद्मश्री पुरस्कार विजेते पं. डॉ. बाळेश बजंत्री, कोरम समाजाचे अध्यक्ष रामजी बजंत्री, मुक्तेश्वर महास्वामीजी, अरळीकट्टी शिवमूर्ती महास्वामीजी, महानगर पालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, ऍड. विजयकुमार होनकेरी, लिंगायत महासभेचे जिल्हाध्यक्ष बसवराज रोट्टी, कन्नड व संस्कृती खात्याच्या उपसंचालिका विध्यावती बजंत्री, महांतेश बजंत्री उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. त्याचप्रमाणे नुली चंदय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाला बेळगाव शहर व जिल्ह्यातील बजंत्री समाजाचे नागरिक, शालेय विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: