बेळगावातील शिवबसवनगर जोतिबा मंदिरात केदार विजय ग्रंथ पारायणाला आज प्रारंभ करण्यात आला.
खास पवित्र श्रावण मासानिमित्त शिवबसवनगर जोतिबा मंदिर समितीच्या वतीने श्री जोतिबा देवाचा महिमा सांगणाऱ्या केदार विजय या ग्रंथाच्या पारायणाचे आज रविवारपासून आयोजन केले आहे. येत्या तीन सप्टेंबरपर्यंत जोतिबा मंदिरात रोज सायंकाळी 5.30 ते 7 वाजेपर्यंत हे पारायण चालणार आहे. यावेळी मंदिराच्या पुजाऱ्यांनी पारायणासंदर्भात भक्तांना माहिती दिली. मंदिराचे पुजारी आणि ज्येष्ठ भक्तांच्याहस्ते ग्रंथपूजन करून
केदारविजय ग्रंथाच्या पारायणाला प्रारंभ करण्यात आला.
या संदर्भात इन न्यूजला माहिती देताना मंदिराचे विश्वस्त अमर येळ्ळूरकर यांनी सांगितले की, पवित्र श्रावण मासानिमित्त जोतिबा मंदिरात जोतिबा अर्थात केदारनाथच्या चरित्राची माहिती देणाऱ्या केदारविजय ग्रंथाच्या पारायणाचे आयोजन 27 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरपर्यंत रोज सायंकाळी 5.30 ते 7 वाजेपर्यंत केले आहे. या पारायणात जोतिबा देवासोबतच यमाई, चोपडाई, महालक्ष्मी देवीचा महिमा सांगण्यात येणार आहे. नाथभक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

आजपासून सुरु झालेल्या केदारविजय ग्रंथ पारायणात केदारनाथ का प्रकट झाले, नाथांना रवळनाथ असे का संबोधतात, शिवरात्री कथन, दक्षिण मोहिमेची सुरवात, गोकठी कथा येमाई प्रकटीकरण, चोपडाई देवी, जेजुरी खंडोबा, येमाई देवीची सविस्तर माहिती, श्रावण षष्ठीचे महत्व, रत्नासूर-रक्तभोज वध आदींची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.
दरम्यान, आज श्रावण रविवारनिमित्त जोतिबा मंदिरात भक्तांनी सहकुटुंब नाथांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.


Recent Comments