बेळगावात जलतरणाला खूप महत्व आहे. कर्नाटकात बेंगळूर, बागलकोटनंतर बेळगावात जलतरणाची सोय चांगली आहे. मात्र येथे जलतरणपटूंसाठी आणखी सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. यासाठी संबंधितांशी बोलून प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
बेळगाव येथील गोवावेस येथील रोटरी क्लब-महानगर पालिकेच्या जलतरण तलावात एल. आर. पाटील यांच्या स्मरणार्थ मराठा युवक संघातर्फे आयोजित 18 व्या आंतरराज्य जलतरण स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात मंत्री जारकीहोळी यांनी सहभाग घेतला.
विजेत्या खेळाडूंना पारितोषिक वितरण केल्यानंतर बोलताना ते म्हणाले, गेल्या 18 वर्षांपासून जलतरण स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या मराठा युवक संघाचे कार्य कौतुकास्पद आहे. मी जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी पुरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. त्याचप्रमाणे गोवावेस जलतरण तलावाच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी मंत्री जारकीहोळी व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर विविध वयोगटात घेण्यात आलेल्या जलतरण स्पर्धेतील विजेत्यांना मंत्री जारकीहोळी यांच्याहस्ते पुरस्कार व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
यावेळी मराठा युवक संघाचे पदाधिकारी बाळासाहेब काकतकर, विनय मांगलेकर, नेताजी जाधव, अजित सिद्दण्णावर, नारायण किटवाडकर, पवार, विकास कलघटगी आणि इतर उपस्थित होते. या जलतरण स्पर्धेत बेळगावसोबतच गोवा, महाराष्ट्रातील जलतरणपटूंनी भाग घेतला.


Recent Comments