मेथोडिस्ट चर्च व अन्य ख्रिश्चन संघटनांतर्फे जे. टी. सिमंड्स हॉल येथे आज रविवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांचा ख्रिश्चन समाजाच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

शहरातील जिल्हा ख्रिश्चन समाजाच्या वतीने बेळगाव जिल्ह्यातील आमदार व मंत्र्यांचा सिमंड्स हॉल येथे सत्कार कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी, आमदार आसिफ उर्फ राजू सेठ, आमदार विश्वास वैद्य, युवा काँग्रेस नेते राहुल जारकीहोळी व मृणाल हेब्बाळकर उपस्थित होते. मात्र गृहलक्ष्मी योजनेच्या कार्यक्रमात व्यग्र असलेल्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर या गैरहजर होत्या. यावेळी ख्रिस्ती समाजाला ख्रिश्चन समुदाय भवन, स्मशानभूमीसाठी जागा देण्याच्या मागणीचे निवेदन ख्रिस्ती नेत्यांनी पालक मंत्री जारकीहोळी यांना दिले.
यावेळी बोलताना आमदार आसिफ सेठ म्हणाले की, काँग्रेसचे सरकार सत्तेवर येण्यासाठी ख्रिश्चन समाजाची भूमिका फार मोठी असून, सतीश जारकीहोळी यांनी ख्रिश्चनांच्या विकासासाठी परिश्रम घेतले आहेत.
मंत्री हेब्बाळकर यांचे सुपुत्र मृणाल हेब्बाळकर यांनी सांगितले की, आमची आई या कार्यक्रमाला येणार होती, मात्र त्या गृहलक्ष्मी योजनेच्या कार्यक्रमात असल्याने त्या येऊ शकल्या नाहीत.
सतीश जारकीहोळी यांचे पुत्र राहुल जारकीहोळी म्हणाले की, काँग्रेस सरकारला ख्रिश्चनांचा पाठिंबा आहे, आम्हाला समाजाचे सहकार्य आहे, सरकारकडून मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घ्या, समाजात समानता प्रस्थापित व्हावी यासाठी आमचे वडील बुद्ध बसव आंबेडकर यांचा आदर्श ठेवून सातत्याने मानवी हक्काचे व्यासपीठ स्थापन करण्यासाठी कार्यरत आहेत.
मंत्री सतीश जारकीहोळी यांनी, काँग्रेसचे सरकार सत्तेत आणल्याबद्दल ख्रिस्ती समाजाचे आभार मानले, आमच्या जिल्ह्यातील आमदार सर्व तुमच्या समाजाला मदत करत आहेत, या देशात ख्रिश्चनांची सेवा अफाट आहे, मदर तेरेसा सारखे अनेक लोक आहेत, भारत अल्पसंख्याक समर्थक देश आहे. इथे कोण कष्ट करतात ते श्रीमंत होतात, सरकार नेहमीच तुमचेच असते, ख्रिश्चनांच्या बाजूने काम करणारा एकच पक्ष आहे, तो म्हणजे काँग्रेस असे त्यांनी सांगितले. काँग्रेस सरकार ख्रिश्चन समुदाय राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी आवश्यक पावले उचलेल, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाला ख्रिश्चन समाजाचे अनेक नेते, पाद्री आणि समाजबांधव उपस्थित होते.


Recent Comments