ग्राहकही विध्यार्थी अन विक्रेतेही विध्यार्थी, आपण बनवलेल्या खमंग खाद्यपदार्थांचे तितकेच मसालेदार वर्णन करून ग्राहक विध्यार्थ्यांना ते खरेदी करण्याची गळ घालणारे विक्रेते विध्यार्थी, गंमतीने टीकाटिपणी करूनही खुशीने साहित्य खरेदी करणारे विध्यार्थी-विद्यार्थिनी असे सर्वत्र उत्साहाने भरलेले वातावरण आज बेळगावातील लिंगराज कॉलेजच्या आवारात पहायला मिळाले. निमित्त होते, कॉलेजतर्फे भरविण्यात आलेल्या व्यापारोत्सवाचे !
होय, वाणिज्य शाखेचा अभ्यास करून भविष्यात व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक बनण्याची स्वप्ने पाहणाऱ्या लिंगराज कॉमर्स कॉलेजच्या विध्यार्थ्यांच्या स्वप्नांना पूर्वानुभवाच्या पंखांचे बळ मिळावे यासाठी कॉलेज व्यवस्थापनाने आज खास व्यापारोत्सवाचे आयोजन केले होते. घरी व घराबाहेर मिळणाऱ्या वस्तू, खाद्यपदार्थ स्वतःच बनवून ते खरेदीविक्री करून व्यावसायिक अनुभव प्राप्त करावा या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यात विध्यार्थ्यानी चहा-कॉफीपासून वडापाव, समोसे, कचोरी, खमंग गिरमिट, चविष्ट भडंग, केक यासह विविध खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने, हस्तकौशल्याच्या शोभिवंत अन सजावटीच्या वस्तू आदींची विक्रीसाठी मांडणी केली. छोट्या टेबलवर आकर्षक सजावट करून स्टॉल्स मांडण्यात आले होते. मित्र-मैत्रिणींना अगदी आग्रहपूर्वक ते खरेदी करण्याची गळ घालण्यात येत होती. “एवढे महाग काय, आम्हाला कसे परवडणार” अशी गंमतीदार टीकाटिपणी करत विध्यार्थी ग्राहक ते आवर्जून खरेदी करत होते.
या व्यापारोत्सवाच्या संकल्पनेचे भरभरून स्वागत केले. चहाचा स्टॉल लावलेल्या संजयगौंडा या विद्यार्थ्याने हा अनुभव भावी जीवनात आपल्याला खूप उपयोगी पडेल असे सांगितले. बसनाईक आणि स्पुर्ती या मित्र-मैत्रिणीच्या साहाय्याने आपण चहा, चुरमुऱ्याचे गिरमिट, समोसा आणि केकचा स्टॉल लावल्याचे त्याने सांगितले.
क्रांती शिंदोळकर या विद्यार्थिनीने सांगितले की, आपण गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सजावटीच्या हस्तकौशल्याच्या वस्तूंचा स्टॉल लावला आहे. स्वतः घरी बनवून हे साहित्य येथे विक्रीसाठी आणले आहे. येथे आल्यावर खरोखरच आपण व्यापारी झालो आहोत, बाजारात विक्री करत आहोत असा छान अनुभव आल्याचे सांगून ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्राचार्य आणि कॉलेज व्यवस्थापनाचे आभार मानले.
या उपक्रमाबद्दल माहिती देताना प्राचार्य डॉ. एच. एस. मेलिनमनी यांनी, कॉमर्सच्या विध्यार्थ्यांसोबतच पीयूसी आणि बीएडच्या विध्यार्थ्यानी व्यापारोत्सवात सहभाग घेतल्याचे सांगितले. विद्यार्थीदशेतच व्यापार-उदीमाचा अनुभव मिळावा, यासाठी हा वार्षिक उपक्रम आयोजित केला असून, त्याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
एकंदर केएलई संस्थेच्या लिंगराज कॉमर्स कॉलेजने विध्यार्थ्यांना व्यापार-उदीमाचा अनुभव मिळावा, यासाठी आयोजित केलेला व्यापारोत्सवाचा उपक्रम विध्यार्थ्यांना चांगला अनुभव देऊन गेला.
Recent Comments