Belagavi

बेळगावात जिल्हास्तरीय कराटे निवड चाचणी स्पर्धा सुरु

Share

कराटे ही आत्मरक्षणासाठीची महत्वाची कला आहे. ती अधिकाधिक मन लावून शिकून यश प्राप्त करा असा कानमंत्र एसीपी नारायण बरमनी यांनी दिला.

बेळगावातील जक्कीन होंडाजवळील संतसेना सांस्कृतिक भवनात आजपासून दोन दिवसीय
जिल्हास्तरीय अधिकृत कराटे निवड चाचणीला प्रारंभ झाला. कराटे डोजोशी संलग्न असलेल्या कराटे संघटनेकडून राज्यस्तरीय स्पर्धेतील सर्वोत्तम भविष्यासाठी ही निवड चाचणी स्पर्धा आज व उद्या होत आहे. फ्लो
निवड चाचणी स्पर्धेचे उदघाटन करून बोलताना मार्केट उपविभागाचे एसीपी नारायण बरमनी पुढे म्हणाले की, इतक्या लहान वयात कराटेपटू लवचिक शारीरिक हालचाली करून कौशल्य प्रदर्शन करतात हे बघून बरे वाटते.

जिंकणे किंवा हरणे यापेक्षा अशा स्पर्धेत खिलाडूवृत्तीने भाग घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. म्हणून जय-पराजयाचा विचार न करता सहभाग घ्या असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी माहिती देताना स्पर्धा संयोजक गजेंद्र काकतीकर यांनी सांगितले की, बेंगळूर येथे 5 सप्टेंबर रोजी होणार्‍या विविध वयोगट आणि वजन गटातील राज्य मानांकन स्पर्धेसाठी ही जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेत 7 ते 14 वयोगटातील सुमारे 400 कराटेपटू सहभागी झाले आहेत.

याप्रसंगी व्यासपीठावर एसीपी नारायण बरमनी, सीपीआय दयानंद शेगुणसी, सतीश कमकारहट्टी, अध्यक्ष गजेंद्र काकतीकर, सचिव जितेंद्र काकतीकर, उपाध्यक्ष रमेश अलगोडेकर, दीपक काकतीकर आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.

आजपासून सुरु झालेली ही निवडचाचणी स्पर्धा उद्या रविवारी सायंकाळपर्यंत चालणार आहे.

Tags: