Belagavi

जाधवनगरात रहिवाशांकडून स्वखर्चाने रस्त्याच्या कामाला प्रारंभ

Share

वारंवार मागणी करूनही बेळगावातील जाधवनगरातील स्विमिंगपुलाशेजारील नाल्याजवळील रस्त्याचे काम महापालिकेकडून करण्यात आले नाही. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी स्वतःच पदरमोड करून या कामाला प्रारंभ केला आहे.

जाधवनगरातील स्विमिंगपुलाशेजारील नाल्याजवळील रस्त्याच्या जागेवर काहीजणांकडून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न चालविला आहे असा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे हा बोळवजा रस्ता चांगल्या पद्धतीने करून द्यावा अशी रहिवाशांची मागणी आहे. मात्र बेळगाव महापालिकेने या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी तत्कालीन आमदार अनिल बेनके यांच्याकडे पाठपुरावा करून स्थानिकांनी या ठिकाणी नाल्याचे बांधकाम करून घेतले. त्यानंतर रस्ताकामाला प्रारंभ होण्यापूर्वीच सरकार बदलले आणि रस्त्याचे काम ठप्प झाले. त्यानंतर स्थानिकांनी पाठपुरावा करूनही मनपाकडून रस्ताकामाला सुरवात केली नसल्याने रहिवाशांनी स्वखर्चाने जेसीबी मागवून रस्ता सपाटीकरण व बांधणी कामाला सुरवात केली आहे.

या संदर्भात इन न्यूजला माहिती देताना अलायन्स क्लबचे संस्थापक व जाधवनगरचे रहिवासी ऍड. दिनकर शेट्टी यांनी सांगितले की, गेली तीस वर्षे मी जाधवनगरात राहत असून, माझ्या घरामागून रस्ता गेला आहे. सीडीपीत तशी स्पष्ट नोंद आहे. त्यामुळे येथे रस्ता करून देणे ही महापालिकेची आणि सरकारची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. या रस्त्यावर नाला हटवून अतिक्रमण करून अपार्टमेंट बांधण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारने त्यासाठी अनुमती दिली तर पावसात बेंगळूरमध्ये नाल्यावरील घरे जशी वाहून गेली तशी येथील घरे व अपार्टमेंटसुद्धा वाहून जाण्याची भीती आहे. त्यामुळे परवानगी न देता रस्ता करून द्यावा अशी मागणी त्यांनी केली.

दुसऱ्या स्थानिक रहिवाशी वैशाली सतीश तरळे आणि तेजस्विनी जाधव यांनी सांगितले की, येथील नाला व रस्त्याच्या जागेत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत. माजी आमदार अनिल बेनके यांच्याकडे सतत मागणी करून आम्ही नाल्याचे बांधकाम करून घेतले आहे. अनेकदा मनपाकडे मागणी करूनही रस्त्याचे काम मात्र केले जात नाहीय. त्यामुळे आम्ही स्वखर्चाने हे काम करत आहोत. मात्र आमोशी नामक एक तथाकथित समाजसेवक आम्हाला काम थांबवायला सांगत आहे. रहिवाशांचा हक्काचा रस्ता झालाच पाहिजे म्हणून आम्ही स्वखर्चाने रस्ता करून घेत आहोत. महापालिकेने याची दखल घेऊन रस्ता करून द्यावा अशी मागणी त्यांनी केली.

एकंदर, बेळगावातील अनेक मोक्याच्या सरकारी जागांवर भूमाफियांचा डोळा असून अनेकांनी अशा जागा बळकावल्याची तक्रार ऐकू येते. जाधवनगरातही असाच प्रकार घडण्याची शक्यता असल्याने स्थानिकांनी स्वखर्चाने रस्त्याचे काम हाती घेतले आहे. आता महापालिका नागरिकांच्या पाठीशी उभी राहते का भूमाफियांना मोकळे रान सोडते हे पहावे लागेल.

Tags: