Belagavi

मनमोहक फळ-फुलझाडांनी सजले बेळगावातील ह्यूम पार्क

Share

बेळगावमधील क्लब रोडवरील ह्यूम पार्क येथे कर्नाटक सरकार, फलोद्यान विभाग, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पंचायत यांच्या वतीने पर्यावरणप्रेमींसाठी रोपबाजाराचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध रंग अन चवीच्या फुलांच्या आणि फळांच्या झाडांनी ह्यूम पार्क अक्षरशः सजले आहे.

फलोद्यान खात्यातर्फे बेळगावमधील क्लब रोडवरील ह्यूम पार्क येथे भरविण्यात आलेल्या तीनदिवसीय रोपबाजाराचे शुक्रवारी सायंकाळी खासदार मंगल अंगडी आणि उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले. यानिमित्त अनेक वैशिष्ट्यपूर्ण प्रजातींची फळे-फुलांची असंख्य रोपे ह्यूम पार्कमध्ये मांडण्यात आली आहेत. बगीचा,उद्यान, टेरेस गार्डनची आवड असणाऱ्या नागरिकांसाठी आवडीची रोपे खरेदी करण्याची संधी फलोद्यान खात्याने उपलब्ध करून दिली आहे.

यासंदर्भात इन न्यूजला माहिती देताना फलोद्यान विभागाचे वरिष्ठ सहाय्यक संचालक किरणकुमार उप्पळे यांनी सांगितले की, पर्यावरणप्रेमींनी पर्यावरणावर प्रेम करावे आणि शेतकऱ्यांना फळे व भाजीपाला वनस्पतींची माहिती व्हावी यासाठी दरवर्षीप्रमाणे या वनस्पती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जगातील सर्वात महागडे मियाझाकी आंबा फळ या प्रदर्शनात ठेवण्यात आले असून येत्या काही दिवसांत ते शेतकऱ्यांना विकण्यासाठी विकसित केले जाणार आहे. गुलाब, मोगरा, जाई-जुई आदी अनेक फुलझाडे, भाजीपाला रोपे, विविध प्रकारचे आंबे व अन्य फळांची रोपे येथे मांडण्यात आली आहेत. खात्याच्या लक्ष्मी टेक येथील जैविक केंद्रात जैविक खतांचीही निर्मिती करून सवलतीच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध असून एक लाख रोपे उपलब्ध असून लोकांचा प्रतिसादही चांगला आहे. उद्या याचा समारोप असल्याचे त्यांनी सांगितले.

केएलई बीएड कॉलेजची विद्यार्थिनी भुवनेश्वरी हिने सांगितले की, या वनस्पती महोत्सवात विविध फुल-फळझाडे प्रदर्शनात ठेवली आहेत. ती पाहून मनाला आनंद आणि समाधान वाटले.
ऍड. प्रभाकर रावळ यांनी इन न्यूजशी बोलताना सांगितले की, फलोत्पादन विभागाने हा वनस्पती महोत्सव नावाचा मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे हे पाहून समाधान वाटले. आमच्याकडे किती प्रकारची फळे आहेत हे माहित नाही.

आज आम्हाला कळले की दहा प्रकारचे आंबे आहेत. येथे विविध प्रकारची फुले आहेत. आम्ही आयुष्यात अशी विविधता पाहिली नाही. ही संधी उपलब्ध केल्याबद्दल आम्ही फलोद्यान विभागाचे आभार मानतो. सरकारने प्रत्येक घरासाठी एक रोप हे धोरण राबवावे, तर घराभोवतीचे वातावरण आणि आपले आरोग्य सुधारेल, असे ते म्हणाले.
एकंदर, ह्यूम पार्क येथे आयोजित केलेल्या रोपबाजारात आपल्या आवडत्या रोपांची खरेदी करून आवड जपण्याची संधी फलोद्यान खात्याने दिली हे प्रशंसनीय कार्य म्हणावे लागेल.

Tags: