सर्व मनोकामना पूर्ण करणारे व्रत म्हणून ओळखले जाणारे वरमहालक्ष्मी व्रत आज बेळगाव शहर व जिल्ह्यात श्रद्धा-भक्तीने आचरण्यात आले. यानिमित्त ठिकठिकाणच्या लक्ष्मी मंदिरात महिला भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
सण-उत्सवांचा महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी वरमहालक्ष्मी व्रताचे आचरण करण्यात येते.
या दिवशी देवी महालक्ष्मीची मनोभावे पूजा करून 5 सुवासिनींनी ओटी भरून एका सवाष्णीला गोडधोड, पंचपक्वान्नांचे भोजन दिल्यास देवी महालक्ष्मी सर्व मनोकामना पूर्ण करते अशी पारंपरिक श्रद्धा आहे. याच श्रद्धेने बेळगाव शहर व जिल्ह्यात ठिकठिकाणी आज महिला भाविकांनी दुसऱ्या श्रावण शुक्रवारच्या मुहूर्तावर देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा करून वरमहालक्ष्मी व्रत साजरे केले.
बेळगावची ग्रामदेवता म्हणून प्रसिद्ध असलेल्या बसवण गल्लीतील महालक्ष्मी मंदिरात आज वरमहालक्ष्मी व्रत पूजेनिमित्त महिलांनी मोठी गर्दी केली होती. केळी, श्रीफळ, फुले, हार, उदबत्ती, कपूर आणि ओटीचे साहित्य घेऊन शेकडो महिलांनी रांगेत उभे राहून शिस्तबद्धरीत्या महालक्ष्मीचे मनोभावे दर्शन घेतले. दर्शनानंतर या महिलांच्या चेहऱ्यावर सात्विक समाधान पसरल्याचे दिसून आले.
दरम्यान, व्रतासंदर्भात इन न्यूजला माहिती देताना कपिलेश्वर कॉलनी येथील रहिवासी उज्ज्वला उदय वरूटे यांनी, गेली 28 वर्षे आपण दरवर्षी नित्यनेमाने वरमहालक्ष्मी व्रत करत असल्याचे सांगितले. आजच्या दिवशी हे व्रत करताना महिला 5 सवाष्णींची खणानारळाने ओटी भरून हळदीकुंकू देतात. देवीला पुरणपोळीचा नैवैध्य दाखवून एका सवाष्णीला जेऊ घातले जाते. आपल्या हिंदू धर्मात सांगितल्याप्रमाणे या व्रताचे आचरण केले जाते. हिंदू धर्म टिकण्यासाठी ही परंपरा सुरु राहिली पाहिजे. यासाठी आम्ही आमच्या मुली व सुनांना याची माहिती देऊन व्रत करण्यास उद्युक्त केले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
गेली 50 वर्षे अव्याहतपणे हे व्रत करणाऱ्या रामनगर येथील रहिवासी सुनीता पांडुरंग पाटील यांनी सांगितले की, दुसऱ्या श्रावण शुक्रवारी केल्या जाणाऱ्या या व्रताला संपत शुक्रवार म्हणूनही ओळखला जातो. यादिवशी शुचिर्भूत होऊन घरी व मंदिरात देवी महालक्ष्मीची खणानारळाने ओटी भरून पूजा करून 5 सवाष्णींची ओटी भरण्यात येते. हे व्रत केल्याने आम्हाला मानसिक समाधान मिळते असे त्यांनी सांगितले.
एकंदर, बेळगाव शहर-परिसरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज दुसऱ्या श्रावण शुक्रवारनिमित्त वरमहालक्ष्मी व्रताचे आचरण महिलावर्गाने मोठ्या श्रद्धा व भक्तीने केल्याचे दिसून आले. मंदिराबाहेर पूजा साहित्याचे स्टॉल्स लावण्यात आले होते.


Recent Comments