Bailahongala

चुन्याची डबी अन मोबाईल नंबरच्या चिठीवरुन उलगडले खुनाचे रहस्य

Share

घरच्यांनी दारू न पिण्याचा सल्ला देऊनही दारूच्या नशेत उपद्रव देणाऱ्या मुलाची पित्यानेच हत्या केल्याची घटना गोकाक तालुक्यातील कुटरनट्टी येथे उघडकीस आली आहे. कसलेही धागेदोरे नसताना केवळ चुन्याची डबी अन मोबाईल नंबरच्या चिठीवरुन या खुनाचे रहस्य उलगडण्यात मुरगोड पोलिसांना यश आले आहे.

संगमेश मारुती तिगडी (वय 39, रा. शिवानंद भारती नगर, बैलहोंगल) असे खून करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. संगमेशसह कांद्याचा व्यापार करणारे यरगट्टी तालुक्यातील मंजुनाथ शेखाप्पा होंगल (43) आणि हत्येला मदत करणारा अडीवेप्पा अजप्पा बोलेट्टीन (38) यांना खुनाच्या आरोपावरून मुरगोड पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना एसपी डॉ. संजीव पाटील यांनी सांगितले की, दारू दुकानात संगमेशला नेऊन दारू पाजून दारूच्या नशेत त्याचा खून करण्यात आला. अडीवेप्पाच्या मदतीने त्याला कुटरनट्टी येथे दुचाकीवर नेऊन, निर्जन भागात दगडाने ठेचून संगमेशचा खून करणाऱ्या आरोपी मंजुनाथला व अडीवेप्पाला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.

खून झालेला संगमेश बैलहोंगल आणि बेळगाव येथे कांदा विक्रीचा व्यवसाय करायचा. आलेल्या नफ्यातून तो रोज दारू पिऊन कुटुंबाला त्रास देत होता. घरच्यांनी दारू सोडण्याचे सर्व सल्ले देऊनही संगमेशने दारू पिऊन घरच्यांना त्रास देणे सुरूच ठेवले होते. त्यामुळे त्याचे वडील मारुती यांनी त्याचा मित्र अडीवेप्पा आणि मंजुनाथ यांच्या मदतीने त्याचा काटा काढला. गोकाक तालुक्यातील अंकलगी येथे तिघांनी दारू प्यायली. नंतर संगमेशला कुटरनट्टी येथे दुचाकीवर नेऊन, निर्जन भागात दगडाने ठेचून संगमेशचा खून करण्यात आला. खुनाचे वृत्त समजताच मुरगोड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला.

संगमेशच्या खिशात सापडलेली चुन्याची डबी आणि आरोपी मंजुनाथचा मोबाईल नंबर लिहिलेली चिठी सापडली. त्याआधारे पोलिसांनी तपास करून आरोपीना अटक केली. याप्रकरणी मुरगोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांदा व्यापाऱ्याच्या हत्येप्रकरणी दोन आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली असून अन्य एका आरोपीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास चालू आहे.
एकंदर, कसलेही धागेदोरे नसताना मुरगोड पोलिसांनी शिताफीने या खून प्रकरणाचे गूढ उकलण्यात यश मिळवले आहे.

Tags: