अखंड वीज पुरवठ्याच्या मागणीसाठी दोन गावच्या ग्रामस्थांनी हेस्कॉम कार्यालयाला घेराव घालून अन्य एका गावचा वीजपुरवठा तोडल्यावरून मोठा गोंधळ माजला. मात्र गोंधळावर नियंत्रण न आणता पोलीस मूक प्रेक्षक बनून उभे राहिल्याची घटना धारवाड तालुक्यातील उप्पीन बेटगेरी गावात घडली.
शेतीच्या पंप संचांना 7 तास पुरेशी वीज पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी कब्बेनूर आणि कल्ले गावातील शेतकऱ्यांनी उप्पीन बेटगेरी गावातील हेस्कॉम कार्यालयाला घेराव घालून उप्पिन बेटगेरी गावाचा वीज पुरवठाही रोखला.
यावेळी हेस्कॉमचे सहाय्यक कार्यकारी अभियंता घटनास्थळी दाखल झाले. उप्पिन बेटगेरी गावात वीज खंडित झाल्यामुळे ग्रामपंचायत अध्यक्ष मंजुनाथ मसूती व इतर सदस्यांनीही येऊन उप्पिन बेटगेरी गावात वीज जोडणी सुरू करण्याची विनंती केली.
यावेळी मल्लण्णा अष्टगी यांनी, उप्पीन बेटगेरी व्यापारी क्षेत्राला आधी वीज जोडणी द्या, अशी मागणी केली. त्यावर कब्बेनूर व कल्ले गावातील शेतकऱ्यांनी, आम्ही शेतकरी असून आम्हाला शेतीसाठी आधी वीज पाहिजे. तुम्ही असा हट्ट करत असाल तर आम्हाला तुमची वीजच नको असे सांगत बाहेर पडू लागले. यावेळी त्यांना परत आणताना एकमेकाला धक्काबुक्की आणि हाणामारी झाली.
पोलीस घटनास्थळी हजर असतानाही या धक्काबुक्कीवर नियंत्रण आले नाही. ग्रामपंचायत अध्यक्ष मंजुनाथ मसूती यांनी मध्यस्थी करून दोन्ही ग्रामस्थांची समजूत काढली. हेस्कॉमचे सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांनीही दिवसाचे सात तास आणि आठवड्यातून सात दिवस अखंड वीज पुरवठा करण्याचे मान्य केले.


Recent Comments