Belagavi

नेहरूनगर तिसऱ्या क्रॉस रस्त्याची प्रचंड दुरवस्था

Share

स्मार्टसिटी म्हणवल्या जाणाऱ्या बेळगाव शहरातील नेहरूनगर या वसाहतीमधील तिसऱ्या क्रॉसच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. महानगरपालिकेला वारंवार कळवून देखील येथील समस्या सोडवल्या जात नसल्याने स्थानिक रहिवाशांनी नावाने संताप व्यक्त केला आहे.


नेहरूनगर हा बेळगाव शहराचा नेहमी गजबजलेला महत्वाचा भाग आहे. या ठिकाणी अनेक हॉस्पिटल्स, महत्वाची खासगी व काही सरकारी कार्यालये, डीमार्ट सारखी आस्थापने असल्याने येथे नेहमी दिवसरात्र वर्दळ सुरु असते. परंतु, येथील एपीएमसी रोड ते मुजावर कॉम्प्लेक्सला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने स्थानिक रहिवाशांबरोबरच वाहनचालकांची, पादचाऱ्यांचा मोठी गैरसोय होत आहे. त्याशिवाय येथे कचऱ्याची उचल, पावसाळ्यात गटारींची सफाई केली जात नसल्याने स्थानिक रहिवाशांनी आक्रोश व्यक्त केला आहे.

या संदर्भात इन न्यूजशी बोलताना एका रिक्षाचालकाने माजी आमदार अनिल बेनके यांच्यासह नगरसेवक व पालिका अधिकाऱ्यांवर चांगलीच आगपाखड केली. या रस्त्यावर इतके खड्डे आहेत की, वाहनचालकच काय पादचाऱ्यांनाही मार्ग शोधत वाट काढावी लागते. अनेक शाळकरी विद्यार्थ्यांचे येथे अपघात होत आहेत. अनिल बेनके यांनी आमदारकीच्या काळात केवळ पहिल्या व दुसऱ्या क्रॉस भागाचा विकास केला. तिसऱ्या आणि चौथ्या क्रॉस भागाचा विकास केला नसल्याने येथे अनेक समस्या आहेत असा आरोप त्यांनी केला.

दमयंती पाटील या महिलेने सांगितले की, नेहरूनगर तिसऱ्या क्रॉस रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्याचप्रमाणे येथे रस्त्याच्या एका कडेचा कचरा उचलला जातो, मात्र दुसऱ्या कडेचा कचरा नेला जात नाही. विचारल्यास, तो भाग आमच्याकडे येत नाही असे सफाई कर्मचारी सांगतात. खड्डे न बुजवल्यामुळे वाहन अपघात, घरात धुळीचे लोट येणे असे त्रास होत आहेत. तक्रार करूनही नगरसेवक, आमदार, अधिकारी दखल देत नाहीत. त्यामुळे आम्ही तक्रार करायची तर कोणाकडे असा प्रश्न पडल्याचे त्यांनी सांगितले. आणखी एका ज्येष्ठ नागरिकाने या रस्त्यावरील खड्डे आणि भागातील समस्या सोडविण्याकडे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय असे त्यांनी सांगितले.
एकंदर, बेळगावचा महत्वाचा वर्दळीचा भाग असलेल्या नेहरूनगर भागातील जनतेच्या समस्यांची दखल घेऊन महापालिका, नगरसेवक, आमदार काय पावले उचलणार हे पाहावे लागेल.

Tags: