Belagavi

बेळगावात संसर्गजन्य रोग नियंत्रणाबाबत प्रकल्प प्रदर्शन

Share

पावसाळ्यात डासांची संख्या वाढते. त्यामुळे पाठोपाठच संसर्गजन्य रोगांचा फैलावही वाढतो. या पार्श्वभूमीवर बेळगाव तालुका व जिल्हा आरोग्य विभाग आणि संसर्गजन्य रोग विभागाने शिक्षण खात्याच्या सहयोगाने शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीचा उपक्रम राबवला.

बेळगाव तालुका आरोग्याधिकारी कार्यालयात डास, डेंग्यू आणि मलेरिया नियंत्रणाबाबत उपाय सुचविणारे विध्यार्थ्यानी तयार केलेल्या प्रकल्पांचे प्रदर्शन आणि स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये बेळगाव शहर आणि ग्रामीण विभागातील 60 प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विध्यार्थ्यानी भाग घेऊन अनेक कल्पक प्रकल्प सादर केले. विध्यार्थ्यानी विज्ञान शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या प्रतिभेच्या बळावर नाविन्यपूर्ण प्रकल्प बनवून सादर केले.

विध्यार्थ्यानी पावसाळ्यात डासांची पैदास आणि पर्यायाने संर्गजन्य रोगांवर नियंत्रण आणण्यासाठी घरांच्या छतावर, परिसरात अनुपयोगी टायर्स व अन्य साहित्यात पाणी साचू देऊन नये, बॅरल, विहिरी व पाण्याची भांडी झाकून ठेवावीत हे व अन्य उपाय सुचविणारे प्रकल्प कौशल्याने बनवले होते. ते पाहताना विध्यार्थ्यांच्या प्रतिभा, कौशल्याला सगळ्यांनीच दाद दिली.

आपण बनवलेल्या प्रकल्पांची माहिती देताना सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वहात होता. येळ्ळूरवाडी कन्नड उच्च प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी ज्योती सनदी हिने इन न्यूजशी बोलताना सांगितले की, पावसाळ्यात डासांची पैदास रोखण्यासाठी शहाळे, नारळाच्या करवंट्या, अनुपयोगी टायर्स व अन्य साहित्यात पाणी साचू देऊ नये, विहिरी, बॅरल्स व पाणी साठवण्याची साधने नेहमी झाकून ठेवावीत याचे मार्गदर्शन मी माझ्या प्रकल्पातून केले आहे.

बालिका आदर्श शाळेच्या विद्यार्थिनी सृष्टी कणबर्गी व नियती सुतार यांनी ओला व सुका कचरा वेगळे करणाऱ्या स्वयंचलित मशीनचा प्रकल्प सादर केला. यात कचरा टाकल्याबरोबर ओला व सुका कचरा वेगवेगळ्या कप्प्यात टाकला जातो. मॉइश्चर सेन्सरमुळे हे शक्य होते. कचरा मशीन भरले की, कचरावाहू गाडी आणि महापालिकेला संदेश जाण्याची व्यवस्था यात आहे असे त्यांनी सांगितले.

प्रदर्शनाबाबत माहिती देताना जिल्हा संसर्गजन्य रोग नियंत्रण अधिकारी डॉ. एम. एस. पल्लेद यांनी सांगितले की, तालुका, जिल्हा व राज्य अशा तीन स्तरांवर विध्यार्थ्यांसाठी अशाप्रकारच्या प्रकल्प निर्माण व प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन आरोग्य विभागाने शिक्षण खात्याच्या सहयोगाने केले आहे. डास आणि संसर्गजन्य रोग नियंत्रणासाठी मुलांच्या माध्यमातून पालक व समाजात जागृती करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

तालुका आरोग्याधिकारी डॉ. शिवानंद मास्तीहोळी यांनी सांगितले की, मुले मनमोकळेपणाने सगळे काही पालकांना सांगतात. त्यामुळे चांगल्या गोष्टींचा प्रचार त्यांच्याकडून समाजात होण्यासाठीचे मुले ही एक चांगले माध्यम आहेत. म्हणून त्यांच्यासाठी या रोगनियंत्रण प्रकल्प स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी शहर व ग्रामीण गट शिक्षणाधिकाऱ्यांचे चांगले सहकार्य लाभले आहे.

आपापल्या शिक्षकांसह मुलांनीही खूप उत्सुकतेने व उत्साहात या स्पर्धेत भाग घेतला आहे. तीन उत्कृष्ट प्रकल्पांना पुरस्कार देण्यात येणार आहेत असे त्यांनी सांगितले.
एकंदर, संसर्गजन्य रोग आणि डासांच्या नियंत्रणासाठी आरोग्य खात्याने शालेय मुलांच्या माध्यमातून हा अभिनव उपक्रम राबवल्याचे दिसून आले.

Tags: