Belagavi

दलित निधीच्या गैरवापराच्या निषेधार्थ मोर्चा निदर्शने

Share

बेळगाव तालुक्यातील तारिहाळ आणि चंदनहोसूर ग्रामपंचायतीकडून अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव 25% निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याच्या मागणीसाठी डॉ. बी. आर. आंबेडकर शक्तिसंघातर्फे जिल्हा पंचायतीसमोर मोर्चा काढून हलगी वाजवत बेमुदत धरणे आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला.

डॉ. बी. आर. आंबेडकर शक्तिसंघाने बेळगाव तालुक्यातील तारिहाळ आणि चंदनहोसूर ग्रामपंचायतीकडून अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव 25% निधीचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी संघातर्फे याआधीही आंदोलन करण्यात आले होते.

त्यावेळी दिलेले आश्वासन पाळलेले नसल्याचा आरोप करून संघातर्फे आज बेळगाव जिल्हा पंचायतीवर मोर्चा काढून धरणे धरण्यात आले. कन्नड साहित्य भवनापासून मोर्चाला सुरवात झाली. त्यानंतर घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे जिल्हा पंचायतीवर मोर्चा नेण्यात आला.

जिल्हा पंचायतीवर मोर्चा आल्यावर तेथे बेमुदत धरणे आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रसारमाध्यमांना माहिती देताना आंबेडकर शक्तिसंघाचे संस्थापक, राज्याध्यक्ष लक्ष्मण कोलकार यांनी सांगितले की, अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव 25% निधीचा तारिहाळ ग्रामपंचायतीने दुरुपयोग केला आहे. याबाबत आम्ही याआधी आंदोलन केले असता, निधी परत देण्याचे, दलित वसाहतींमध्ये त्या निधीतून विकासकामे करण्याचे आश्वासन देण्यात आले.

मात्र अनेक महिने उलटले तरी काहीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे बेळगाव तालुका पंचायतीचे मुख्याधिकारी धनवाडकर, पीडीओ गुजनाळ, ग्रापं सचिव नाईक यांना निलंबित करून त्यांची बेळगाव जिल्ह्याबाहेर बदली करावी या मागणीसाठी आम्ही बेमुदत धरणे आंदोलन छेडले आहे. आमची मागणी पूर्ण होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, जिल्हा पंचायतीच्या आवारात हलगी वाजवत, घोषणा देत आंबेडकर शक्तिसंघाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. धरणे आंदोलनात आंबेडकर शक्तिसंघाचे संस्थापक-राज्याध्यक्ष लक्ष्मण कोलकार यांच्या नेतृत्वाखाली बाबू पुजारी, सागर कोलकार, मल्लाप्पा मटगार, मल्लाप्पा कोलकार, शेखर मेत्री, शोभा मेत्री, कस्तुरी निंगण्णावर यांच्यासह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला.

Tags: