शहीद जवानांच्या वीरपत्नींचे उर्वरित आयुष्य संघर्षमय असते. आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण करणे आणि त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याचे आव्हान त्यांना पेलावे लागते. समाजानेही अशा वीरपत्नींना प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन झुवारी कंपनीचे उपाध्यक्ष आर. वाय. पाटील यांनी केले.

वेदांत फाऊंडेशन आणि एज्युकेशन इंडियातर्फे टिळकवाडी येथील खासगी हॉटेलच्या सभागृहात आयोजित वीरपत्नींच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. प्रास्ताविक वेदांत फाऊंडेशनचे अध्यक्ष सतीश पाटील यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. डॉ. डी. एन. मिसाळे म्हणाले, जीवन हे सुंदर असून वीरपत्नींनी खचून न जाता नवे जग निर्माण करण्यासाठी कार्यरत रहावे. डॉ. एज्युकेशन इंडियाचे चेअरमन मंजित जैन यांनी बोलताना वीरपत्नींनी मुलांच्या शैक्षणिक अडचणीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
यानंतर मान्यवरांच्या हस्ते कर्नाटक व महाराष्ट्रातील विजापूर, धारवाड, कारवार, बेळगाव व कोल्हापूर येथील 21 वीरपत्नींचा सन्मान करण्यात आला. वीरपत्नींना सन्मानचिन्ह, पैठणी साडी व भेटवस्तू देवून सन्मानित करण्यात आले. रेखा खादरवाडकर व ललिता मंजुनाथ या वीरपत्नींनी मनोगत व्यक्त केले.
वेदांत फाऊंडेशनने दत्तक घेतलेल्या गिरीश धुपदाळ (वडगाव) या एमबीबीएसमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याचा फाऊंडेशनतर्फे शाल व भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. यावेळी उमेश बाळेकुंद्री, सविता चंदगडकर, अस्मा नाईक, सुनील देसूरकर, शायजू नायर, शोभा पाटील, शोभा देगळोली, सुजाता लोखंडे, सी. वाय. पाटील, गिरीश जगजंपी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सेक्रेटरी ईश्वर पाटील यांनी तर एन. डी. मादार यांनी आभार मानले.


Recent Comments