सरकारचे अपयश, भ्रष्टाचार झाकण्यासाठी काँग्रेसकडून पक्षांतराच्या अफवा उठवल्या जात आहेत असा आरोप माजी मुख्यमंत्री सदानंदगौडा, माजी उपमुख्यमंत्री अश्वत्थनारायण यांनी केला. भाजपचा एकही आमदार काँग्रेसमध्ये जाणार नसल्याचा दावाही त्यांनी केला.
बेंगळूरमधील मल्लेश्वरममधील भाजप कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना ‘ऑपरेशन हस्त’बाबत माजी मुख्यमंत्री व खासदार डीव्ही सदानंद गौडा यांनी काँग्रेस नेत्यांवर हल्लाबोल केला. समुद्रात खडे फेकण्याचे काम सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार करत आहेत. आपला गोंधळ झाकण्यासाठी ते खोट्या बातम्या पसरवत आहेत. तीनच महिन्यात काँग्रेसचे भोंदू नाटक लोकांना कळले आहे. बैरती बसवराज म्हणाले मी काँग्रेसमध्ये जाणार नाही.
गोपालय्याही काँग्रेसमध्ये गेले नाहीत, त्यांनी हवे तर फाशी घेऊ पण काँग्रेसमद्ये जाणार नसल्याचे सांगितले आहे. एसटी सोमशेखर यांनीही मी काँग्रेसमध्ये जाणार नसल्याचे सांगितले. मी सोमशेखर यांना आधी फोन केला होता.त्यांच्या मतदारसंघात काही अंतर्गत समस्या आहे. सोमशेखर काँग्रेसमध्ये जाणार नाहीत अशी आमची अपेक्षा असल्याचं सांगत सदानंद गौडा यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
यावेळी बोलताना माजी उपमुख्यमंत्री अश्वत्थनारायण यांनी, सरकारचे अपयश, भ्रष्टाचार झाकण्यासाठी काँग्रेसकडून पक्षांतराच्या अफवा उठवल्या जात आहेत असा आरोप केला. काँग्रेस सरकारने राज्याचा विकास ठप्प केला आहे. शेतकरी कल्याणाच्या अनेक योजना रद्द करून शेतकरीविरोधी धोरण राबवत आहे.
त्यामुळे जनतेत हाहाकार माजला आहे. केवळ बदल्यांचा भ्रष्टाचार सरकार करत आहे. जनतेने 130 आमदार निवडून देऊनही त्यांना काँग्रेसला सांभाळता येत नाहीत. ज्येष्ठ आमदारांना अधिकार देता येत नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु आहे.
हे अपयश आणि भ्रष्टाचार लपवून लोकांचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी काँग्रेस नेते व सरकार पक्षांतराच्या मुद्द्यावरून जनतेची दिशाभूल करत आहेत. काँग्रेस सोडून भाजपात आलेले कोणीही आमदार पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार नाहीत. आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजप खासदारच मोठ्या संख्येने निवडून येतील.
मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी जनता उत्सुक आहे. त्यामुळे भाजपला यश मिळेल असा दावाही अश्वत्थनारायण यांनी केला.
एकंदर, आपले अपयश, भ्रष्टाचार झाकण्यासाठी काँग्रेस पक्षांतराच्या वावड्या उठवत असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केलाय.


Recent Comments