Belagavi

सांबरा एटीएसमध्ये मित्रराष्ट्रांच्या योध्यांनाही प्रशिक्षण

Share

बेळगावातील सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग स्कूलची ख्याती आता साता समुद्रापार पोहोचली आहे. या एटीएसमध्ये आता भारतीय वायू अग्निवीर आणि मित्रराष्ट्रांच्या हवाई दल जवानांना आधुनिक कालानुरूप उत्तमोत्तम प्रशिक्षण देण्यात येत आहे.

मित्रराष्ट्रांच्या हवाई दल जवानांसाठी उत्तम प्रशिक्षण देणारे केंद्र म्हणून बेळगावचे सांबरा एअरमन ट्रेनिंग स्कूल नावारूपाला आले आहे. एअर कमोडोर एस. श्रीधर यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून एटीएसच्या कामगिरीची माहिती दिली.

भारतीय हवाई दलात भरती होणार्‍या अग्निवीर जवानांना येथे विविध स्तरांचे प्रशिक्षण दिले जात आहे. कट्रे, लाल, लतीफ, मजुम्हर आणि मेहर या पाच स्वतंत्र स्क्वाड्रन पथकांतर्गत प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

युद्धविमानांचे सुटे भाग, युद्धविमानात बसवलेल्या बॉम्ब आणि इतर शस्त्रास्त्रांविषयी माहिती देणे, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करणे आणि भरती झालेल्यांना ते देण्याच्या पद्धतीबाबतही काटेकोर नियमांचे पालन करावे लागते. त्यासाठीही उमेदवारांची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

वायू सैनिकांना शारीरिक सहनशक्ती तसेच मानसिक कणखरपणाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांना चपळ योद्धा आणि युद्धासाठी सज्ज युवक म्हणून प्रशिक्षित केले जाते. आम्ही विमानाचे विविध घटक आणि इंजिन, भारतीय हवाई दलात वापरण्यात येणारी शस्त्रे यांची माहिती देतो. तसेच शत्रूच्या छावणीतील शस्त्रांपासून स्वतःचे संरक्षण करण्याच्या यंत्रणेबद्दल याची माहिती दिली जाते, असे ते म्हणाले.
प्रशिक्षणार्थींना विविध परीक्षा लिहिण्यासाठी ऑनलाइन प्रणाली तयार करण्यात आली आहे. जिम्नॅस्टपटूंसाठी

येथे एक सुसज्ज व्यायाम शाळा देखील आहे. या प्रकारात काहींनी राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करून पदके मिळवल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीलंका, मॉरिशस आणि कॅमेरून येथील हवाई दलातील जवानांनाही आयएएफ जवानांसह लढाऊ आणि गैर-लढाऊ प्रशिक्षण दिले जात आहे, असे एअर कमोडोर एस. श्रीधर यांनी सांगितले.

एकंदर, केवळ भारतीयच नव्हे तर परदेशी हवाईयोध्यांना प्रशिक्षण देणारे केंद्र म्हणून सांबरा एअरमन ट्रेनिंग स्कूलची ख्याती आता आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली आहे. यामुळे बेळगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय ही बेळगावकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे.

Tags: