Belagavi

बेळगाव लोकसभेच्या उमेदवारीसाठी भाजपमध्ये चुरस; इच्छुकांच्या दिल्लीवाऱ्या सुरु

Share

विधानसभेच्या सेमीफायनलनंतर आता लोकसभेच्या फायनलची तयारी राजकीय पक्षांनी सुरु केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीची लॉटरी कोणाला लागणार याविषयी बेळगाव लोकसभा मतदार संघात आतापासूनच कुतूहल निर्माण झाले आहे. तिकिटासाठी इच्छुक नेत्यांच्या बड्या नेत्यांच्या गाठीभेटींसाठी दिल्लीवाऱ्या सुरु झाल्या आहेत. चला पाहू नेमक्या काय घडामोडी घडताहेत या विशेष रिपोर्टमधून…

विधानसभा निवडणूक संपल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांना आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुकांनी आतापासूनच उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यातही बेळगाव लोकसभा मतदार संघात राजकीय पक्षांत हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव लोकसभेच्या तिकीटासाठी भाजपमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे.

भाजपने विधानसभेला ग्रामीण आणि उत्तर मतदार संघात उमेदवारी नाकारलेल्या माजी आमदार अनुक्रमे संजय पाटील आणि अनिल बेनके यांनी लोकसभेच्या उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली आहे. तर विधान परिषदेवर जाण्यात अपयशी ठरलेले माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, कर्नाटकचे दिल्लीतील माजी प्रतिनिधी आणि ज्येष्ठ भाजप नेते बीएस येडियुरप्पा यांचे निकटवर्ती मानले जाणारे शंकरगौडा पाटील यांनीही लॉबिंग सुरु केले आहे.

तशातच, पक्षाने आदेश दिल्यास मीदेखील लोकसभा लढवेन असे सांगत विद्यमान राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांनी उमेदवारीच्या रिंगणात उडी घेतल्याने भाजपच्या इच्छुकांची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या लोकसभेच्या तिकिटासाठी इच्छुक असलेल्यांच्या हालचालींना वेग आला आहे. बेळगाव भाजपचे नेते दिल्लीतील उच्चभ्रू मंडळींना उमेदवारीसाठी आतापासूनच भेटत आहेत.

बेळगाव लोकसभा मतदार संघात येणाऱ्या गोकाक, अरभावी, रामदुर्ग, सौंदत्ती आणि बैलहोंगल तालुक्यांमध्ये लिंगायत मतांचे प्राबल्य असल्याने राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दुसरीकडे बेळगाव ग्रामीण, उत्तर व दक्षिण या तिन्ही मतदारसंघात मराठा समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे. त्यामुळे मराठा कार्ड वापरून लोकसभा लढवण्याचा माजी आमदार अनिल बेनके यांचा मनसुबा आहे.

भाजप महानगर जिल्हाध्यक्ष पदावर राहून जिल्ह्यात दबदबा निर्माण केलेले ग्रामीणचे माजी आमदार संजय पाटील यांचीही लोकसभा लढवण्याची इच्छा लपून राहिलेली नाही. 2004 पासून बेळगाव लोकसभा मतदार संघातून सलग पाच वेळा भाजपचे खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे लोकसभेच्या उमेदवारीची लॉटरी लागली की पुरे, विजय सोपा होतो असा इतिहास असल्याने भाजपमधील इच्छुकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.
एकूण काय, तर लिंगायत आणि मराठा मते निर्णायक असलेल्या भाजपचा बालेकिल्ला असलेल्या बेळगाव लोकसभा मतदारसंघातून कोणाला तिकीट मिळणार, हे पाहणे कुतूहलाचे ठरणार आहे.

Tags: