Belagavi

ऐतिहासिक राजहंसगडावर प्रथमच फडकला तिरंगा !

Share

बेळगाव तालुक्यातील येळ्ळूरजवळील ऐतिहासिक राजहंसगडावर आज प्रथमच सर्व देशवासीयांच्या स्वाभिमानाचा विषय असलेला तिरंगा ध्वज फडकला. माजी सैनिक, शाळकरी मुले, महिला व स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांच्या सर्वात उंच पुतळ्याच्या साक्षीने आज गडावर प्रथमच स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.

केवळ नाव घेताच स्फुरण चढावे अशा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या देशातील सर्वात उंच पुतळ्याच्या साक्षीने राजहंसगडावर आज स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी मंगळवारी ऐतिहासिक राजहंसगड किल्ल्यावर प्रथमच राष्ट्रध्वज फडकवला. प्रारंभी गडावरील सिद्धेश्वर मंदिरात भारतमातेच्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांनी देशसेवा करणाऱ्या १५ सैनिकांचा गौरव केला.

यावेळी एपीएमसी अध्यक्ष व काँग्रेस नेते युवराज कदम, बसवराज म्यागोटी, एस. एम. बेळवटकर, सिद्धप्पा छत्री, बाबा पवार, भरमा पाटील, अनिल पाटील, मल्लिकार्जुन लोकूर, संजीव मादार, नामदेव नागेनट्टी, रघु खांडेकर, पद्मराज पाटील, सातेरी कोकितकर यांच्यासह शालेय विध्यार्थी, परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Tags: