Belagavi

चिकोडीतील नूतन माता बाल रुग्णालय उदघाटनाच्या प्रतीक्षेत

Share

बेळगाव जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या नागरिकांना योग्य वैद्यकीय सुविधांशिवाय शेजारील महाराष्ट्रातील मिरज सांगली येथे जावे लागते. हे टाळण्यासाठी सात वर्षांपूर्वी रुग्णालयाच्या उभारणीचे काम सुरू करण्यात आले. काम सुरू होऊन सात वर्षे रेंगाळलेले इमारतीचे काम आता जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र आतापर्यंत या हॉस्पिटलला उदघाटनाचे भाग्य लाभलेलं नाही . ते हॉस्पिटल कोणते? पाहुयात त्याबद्दल हा रिपोर्ट …..

बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी येथील बानंती कोडी रोडवर उभारण्यात आलेल्या या माता व बाल रुग्णालयाच्या उभारणीला सात वर्षे झाली आहेत. तब्बल सात वर्षांच्या विलंबानंतर पूर्णत्वास आलेले हे रुग्णालय जनतेच्या वापरासाठी कधी उपलब्ध होणार, असा सवाल या भागातील नागरिक करत आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी उपविभागात, योग्य सरकारी रुग्णालये नसल्याने , लोक मिरज सांगली, महाराष्ट्रातील खाजगी रुग्णालयांमध्ये जात आहेत . हे टाळण्यासाठी चिक्कोडी येथे सुसज्ज माता व बाल रुग्णालय बांधण्याची मागणी जोर धरू लागली होती. आमदार प्रकाश हुक्केरी यांनी सातत्याने प्रयत्न करून चिक्कोडीला १०० खाटांचे माता व बाल रुग्णालय मंजूर केले. 2015 मध्ये इमारतीचे काम सुरू झाले आहे. हे बांधकाम सुरू होऊन सात वर्षे झाली तरी अद्याप उद्घाटन झालेले नाही. चिक्कोडी येथील सार्वजनिक रुग्णालयाचीही दुरावस्था झाली असून, पावसाळ्यात रुग्णालयात बादल्या, टोपल्या ठेवल्या जातात, अशी परिस्थिती आहे. रुग्णालय लवकरात लवकर लोकार्पण व्हावे, असा लोकांचा आग्रह आहे.

बांधकामाच्या दिरंगाईमुळे खुद्द आमदार प्रकाश हुक्केरी यांनी खुल्या मंचावर अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. बांधकामासाठी जबाबदार असलेल्या कर्नाटक आरोग्य यंत्रणा विकास आणि सुधारणा प्रकल्प अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला २० पेक्षा जास्त वेळा नोटिसा बजावल्या आहेत पण त्याचा काही उपयोग झाला नाही. याबाबत बोलताना चिक्कोडी सार्वजनिक रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष कोन्नूरी म्हणाले की, चिक्कोडी सार्वजनिक रुग्णालयात नवीन माता व बाल रुग्णालयाचे बांधकाम 2015 मध्ये सुरू झाले ते आजतागायत पूर्ण झालेले नाही. कोविडमुळे विलंब झाला. त्यानंतर पुन्हा इमारतीचे काम सुरू झाले. आणखी महिनाभरात रुग्णालयाचे उद्घाटन करण्याचे नियोजन आहे. इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. अंतर्गत काम पूर्ण केले. आधीच 80 टक्के वैद्यकीय उपकरणेही आली आहेत. रुग्णालयासाठी आवश्यक वैद्यकीय कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. स्त्रीरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ बाल तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येणार आहे. वैद्यकीय उपकरणे येऊन सहा महिने झाले आहेत. हायटेक सर्जिकल युनिट,आणि लिफ्ट ही दोन कामे करायची असल्याचे सांगितले.

डॉ. संतोष कोन्नूरी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, चिक्कोडी सार्वजनिक रुग्णालय

काही झाले तरी शासनाने जागे होऊन लवकरात लवकर हे रुग्णालय जनतेच्या हितासाठी लोकार्पण करावे, अशी येथील जनतेची मागणी आहे.

Tags: