राज्यातील नव्या सरकारने वीजदर वाढविल्याने वस्त्रोद्योग व्यवसाय संकटात सापडला आहे. कोविडमुळे चार वर्षांपासून आधीच संकटात असलेल्या या व्यवसायाचे वीजदर वाढीमुळे कंबरडे मोडले आहे.
त्यामुळे वस्त्रोद्योगाला पूर्वीच्याच दराने वीजबिल आकारावे, विणकरांसाठीच्या ठप्प झालेल्या कल्याणकारी योजना पुन्हा सुरु कराव्यात आदी मागण्या उत्तर कर्नाटक नेकार (विणकर) होराट समितीने केल्या आहेत.
बेळगावात आज पत्रकार परिषदेत बोलताना उत्तर कर्नाटक नेकार (विणकर) होराट समितीचे संचालक गजानन गुंजेटी यांनी याबाबत सांगितले की, विणकरांच्या विविध मागण्यांसाठी आमच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांची ‘कृष्णा’ या गृहकचेरीत नुकतीच भेट घेऊन चर्चा केली आहे. उद्या मुख्यमंत्री बेळगावला येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आमच्या मागण्या त्यांच्या कानावर घालण्यात येणार आहेत.
राज्य सरकारने वीजमागाला लागणाऱ्या विजेचे दर भरमसाठ वाढवले आहेत. एफएसी 2.50, किमान दर 140, मीटरचार्ज, जीएसटी आदी मिळून प्रति युनिट 7.45 रुपये दराने बिल आकारण्यात येत आहे. ते भरणे विणकरांच्या आवाक्याबाहेर आहे. पूर्वीच्या भाजप सरकारने विणकरांना 1.25 रुपये प्रति युनिट दर आकारणी केली होती.
त्यामुळे वस्त्रोद्योग व्यवसायाला मदत झाली होती. निवडणुकीपूर्वी खुद्द सिद्दरामय्या यांनीही विणकरांना कमी दराने वीजबिल आकारण्याचे आश्वासन दिले होते. ते त्यांनी पूर्ण करावे आणि पूर्वीच्याच दरानं बिल आकारावे अशी मागणी त्यांनी केली.
राज्यातील वस्त्रोद्योग व्यवसाय कोविड, महापूर व अन्य कारणांमुळे आधीच अडचणीत आहे. तशातच वाढीव वीजदराने त्याचे कंबरडे मोडले आहे. विणकरांसाठी हातमाग, वीजमाग आणि कावेरी हँडलूम्स अशी तीन महामंडळे असली तरी ती केवळ नावालाच आहेत. विणकर कल्याणाच्या कोणत्याच योजना त्यांच्याकडून राबविण्यात येत नाहीत. वस्त्रोद्योग व्यवसायाला आधार देण्यासाठी राज्य सरकारच्या परिवहन, महिला व बालकल्याण, पोलीस, गृहरक्षक, अंगणवाडी, आरोग्य आदी खात्यांना लागणारे गणवेश कापड आणि साड्या या मंडळांच्या माध्यमातून राज्यातील विणकरांकडूनच खरेदी कराव्यात अशी मागणी त्यांनी केली.
विणकरांसाठी 90 रुपये मासिक हप्त्यातून आरोग्य विमा, विणकरांची मुलांसाठीची शिष्यवृत्ती योजना व्यवसाय कर्ज योजना आदी कल्याणकारी योजना बंद पडल्या आहेत. त्या पुन्हा सुरु कराव्यात आदी मागण्या गजानन गुंजेटी यांनी केल्या.
यावेळी बोलताना संचालक व्यंकटेश सोनटक्की म्हणाले की, राज्य सरकारने राज्यातील वस्त्रोद्योग उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी पावले उचलावीत, अन्यथा विणकरांना महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तमिळनाडू आदी राज्यात जाऊन व्यवसाय करावा लागेल असा इशारा त्यांनी दिला.
पत्रकार परिषदेला उत्तर कर्नाटक नेकार (विणकर) होराट समितीचे संचालक नागराज हुगार, आनंद हुपरी, विनोद बंगोडी, रमेश पाटील, बसवराज ढवळी आदी उपस्थित होते.


Recent Comments