Belagavi

जायंट्स मेनच्या वतीने क्रांतिदिनी ध्वजारोहण

Share

बेळगाव:इंग्रजांच्या गुलामगिरीतुन देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणाची आहुती दिली त्या तमाम क्रांतिवीराना स्मरण करण्याचा दिवस म्हणजे नऊ ऑगस्ट हा होय.

दीडशे वर्षे भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांना देशातुन हुसकावून लावण्यासाठी ९ ऑगस्ट १९४२ रोजी क्रांतीची ठिणगी पडली आणि इंग्रजांना चले जाओ चा नारा देण्यात आला व १५ ऑगस्ट१९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला.
तेव्हापासून ९ ऑगस्ट हा दिवस क्रांतीदिन म्हणून साजरा करण्यात येतो.

जायंट्स मेनच्या माध्यमातून हुतात्मा चौकातील हुतात्मा स्मारक येथे हा कार्यक्रम करण्यात आला.
सुरुवातीला अध्यक्ष सुनिल मुतगेकर यांच्याहस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस तर संतोष होंगल यांच्याहस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
स्वातंत्र्यप्राप्तीसाठी प्राणाची आहुती दिलेल्या स्वातंत्र्यवीरांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्मारकाचे पूजन अशोक हलगेकर यांनी केले.
त्यानंतर हुतात्मा स्मारक कमिटीचे अध्यक्ष दिलिप सोहनी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत म्हणण्यात आले.
यावेळी बोलताना दिलीप सोहनी यांनी क्रांतीदिनाबद्दलची माहिती देऊन ज्या स्वातंत्र्ययोध्यामूळे आम्हास स्वातंत्र्य मिळाले त्यांना अभिवादन केले.

मदन बामणे यांनी आपले विचार व्यक्त करताना आजच्या पिढीसाठी हा दिवस अनोळखी असल्याची खंत व्यक्त केली.
प्रत्येकाच्या हृदयात क्रांतिवीरांची मशाल आठवणींच्या रुपात धगधगत राहणे अपेक्षित असले तरी ती मशाल विझली असल्याने प्रशासनाने यात लक्ष घालून विद्यार्थीदशेतच याविषयी माहिती व्हावी यासाठी हा दिवस प्रशासकीय स्वरूपात साजरा करावा असे सांगितले.

यावेळी सुनिल मुतगेकर आणि संतोष होंगल यांनीसुद्धा आपले विचार व्यक्त केले.
यावेळी उपाध्यक्ष अविनाश पाटील,अरुण काळे, सचिव लक्ष्मण शिंदे, खजिनदार विजय बनसूर, अजित कोकणे, भरत गावडे व इतर उपस्थित होते.

Tags: