Belagavi

टिपू सुलतान अभिमानी महावेदिकेच्या वतीने बेळगावात निदर्शने

Share

मणिपूरमध्ये महिलांची नग्न मिरवणूक आणि बलात्कार, हरियाणातील गुडगाव येथील इमामाची हत्या आणि मुस्लिमांच्या संपत्तीची नासधूस आणि जयपूर-मुंबई रेल्वेत जवानाकडून झालेले हत्याकांड आदी हिंसाचाराच्या घटनांच्या विरोधात टिपू सुलतान अभिमानी महावेदिकेच्या वतीने बेळगावात निदर्शने करण्यात आली.

देशभरात अल्पसंख्याक, आदिवासी आणि दलित महिलांवर बलात्कार, शोषण आणि हत्या सातत्याने होत आहेत. केंद्र आणि संबंधित राज्य सरकारे याकडे डोळेझाक करत आहेत. ते आरोपींना मदत करून अल्पसंख्याकांवर अत्याचार करत आहेत. त्यामुळे पीडित चिंतेच्या वातावरणात आहेत. आरोपी अत्याधुनिक शस्त्रे घेऊन रस्त्यावर उतरून अल्पसंख्याकांची हत्या करत असताना पोलीस कर्तव्य विसरून मूक प्रेक्षक बनून बघत राहतात असा आरोप करून भारताच्या राष्ट्रपतींनी आरोपींना शिक्षा करावी, घटना घडलेल्या संबंधित सरकारांना बरखास्त करून आम्हाला संरक्षण व न्याय द्यावा अशी मागणी टिपू सुलतान अभिमानी महावेदिकेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेतर्फे आज घोषणा देत निदर्शने करण्यात आली.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना वेदिकेच्या महिला विभाग जिल्हाध्यक्षा तबस्सुम इकबाल अहमद मुल्ला म्हणाल्या की, निवडणुकीपूर्वी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ असा नारा देणाऱ्या पंतप्रधान मोदींनी मणिपूर हिंसाचाराच्या घटनेनंतर 68 दिवसांनंतर मौन सोडले. जी व्यक्ती देशाच्या मुलींचे, महिलांचे रक्षण करू शकत नाही ती, पंतप्रधान होण्याच्या लायकीची नाही. मणिपूरच्या घटनेत देशासाठी युद्ध लढलेल्या सैनिकाच्या पत्नीची विवस्त्र धिंड काढण्यात आली, तिचे रक्षण सरकारला करता आले नाही ही लाजिरवाणी बाब आहे. देशातील महिला, मुली आज सुरक्षित नाही. त्यांचे अपहरण, बलात्कार या गोष्टी नित्याच्या झाल्या आहेत. अल्पसंख्यांकावर हल्ले, हत्या होत आहेत. हे थांबविण्यासाठी राष्ट्रपतींनी यात हस्तक्षेप करून सरकारला कडक निर्देश द्यावेत अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी बोलताना वेदिकेच्या कार्यकर्त्या मेनका यांनी सांगितले की, एक मुलगी वाढवायची तर किती कष्ट, त्रास घ्यायला लागतात. पण दुर्दैवाने आज देशात मुली व महिला सुरक्षित नाहीत. त्यांचे रक्षण करण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलावीत अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी निदर्शकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. निदर्शनात इम्रान तापकीर, विद्या सत्यागोळ, आसिफ मुल्ला यांच्यासह टिपू सुलतान अभिमानी महावेदिकेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: