Udupi

गृहलक्ष्मी योजनेसाठी 1 कोटी नोंदणी; मंत्री हेब्बाळकर यांनी व्यक्त केला आनंद

Share

कर्नाटक सरकारच्या बहुप्रतिक्षित योजनांपैकी एक असलेल्या ‘गृहलक्ष्मी’ योजनेसाठी राहात आतापर्यंत एक कोटी महिलांनी नोंदणी केली आहे. या विक्रमी नोंदणीबद्दल महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आनंद व्यक्त केला आहे.

19 जुलै रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळुरूच्या विधानसौदा येथील बँक्वेट हॉलचे उद्घाटन केले. त्यानंतर 20 जुलैपासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली. एकूण 1.28 कोटी लाभार्थी आहेत आणि नोंदणी प्रक्रिया सुरू झाल्यापासून 15 दिवसांच्या आत एक कोटीहून अधिक महिलांनी त्यांची नावे नोंदवली आहेत. बेंगळूर वन, कर्नाटक वन, बापूजी सेवा केंद्रांवर नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. महिला कोणतेही शुल्क न भरता नाव नोंदणी करू शकतात. 16 किंवा 20 ऑगस्टला बेळगावात होणाऱ्या या मोठ्या परिषदेत योजनेचे लोकार्पण करण्यात येईल. त्यानंतर लगेचच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दरमहा 2000 रुपये जमा केले जातील असे महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.

माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी पाच हमी योजनांबाबत केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना, ज्या योजनांचे जनतेने स्वागत केले आहे, त्यांचा जनतेला लाभ होत नाही, त्या बंद करा असे ते म्हणतात, यावरून त्यांची भूमिका स्पष्ट होते असा टोला त्यांनी हाणला. कुमारस्वामी आणि पंतप्रधान मोदींची जवळीक वाढल्याबाबतच्या प्रश्नावर, त्यांना भाजपमध्ये जायचे असेल तर ते खुशाल जाऊ देत, त्यांचे स्वागत करू, पण केवळ वावड्या उठवून हिट अँड रन करू नये असे त्यांनी सांगितले.

उडुपी कॉलेज घटनेप्रकरणी अटक केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्यांवर गुभे दाखल केल्याबाबतच्या प्रश्नावर मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या की, आंदोलन करणे हा लोकशाहीत प्रत्येकाचा अधिकार आहे. आंदोलन केल्यामुळे नव्हे तर आंदोलनात प्रक्षोभक भाषण केल्यावरून गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी तपास योग्य दिशेने सुरु आहे. कायदा आपले काम करेल.

आंदोलनामुळे जातीय सौहार्द धोक्यात येऊ नये. भाजपवाले नेहमी वसुधैव कुटुंबकम, रामराज्याचा जप करत असतात. मग या रामराज्यात जातीय, धार्मिक सौहार्दाला धक्का लागू नये हीच काँग्रेसची विचारसरणी आहे असा टोला मंत्री हेब्बाळकर यांनी भाजपला लगावला.

एकंदर, गृहलक्ष्मी योजनेसाठी राज्यात एक कोटी महिलांनी नावनोंदणी केल्याबद्दल मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Tags: